विमा कर्मचार्‍याचा प्रामाणिकपणा; सापडलेली पर्स बक्षीसही न घेता केली परत !

चोपडा लतीश जैन । सध्याच्या काळात प्रामाणिकपणा हा अतिशय दुर्मीळ गुण झाला असतांना एका विमा कर्मचार्‍याने त्याला सापडलेली पर्स ही संबंधीत महिलेस परत तर केलीच पण त्यांनी स्वखुशीने देऊ केलेले बक्षीसही नाकारले. यामुळे त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.

याबाबत वृत्त असे की, चोपडा शहरातील शंकर-पार्वती नगरमधील रहिवासी व ग.स. संस्थेचे शाखाधिकारी शिवाजीराव बाविस्कर यांची सुकन्या सौ.भाग्यश्री महेश शिंदे ह्या चोपडा येथून कुसूंबा धुळे येथे सासरी गेल्या. यानंतर त्यांना पतीच्या नोकरीनिमित्त फोरव्हिलर वाहनाने पुणे येथे जायचे होते. सोबत जेठ व जेठाणी,लहान मुलेही होती. प्रवासा दरम्यान तळेगाव दाभाडे फाट्याच्या पुढे ते एका ठिकाणी चहापाणी, नाश्ता साठी थांबले असता अनावधानाने हातातील पर्स गाडीच्या टपावर ठेवली गेली. परत आल्यावर सर्वजण गाडीत बसून पुढील प्रवासाला निघाले असता तळेगाव दाभाडे येथील विमा कर्मचारी गोरख बरडे हे मोटारसायकलने संगमनेर कडे जात असतांना त्यांचे लक्ष गाडीवरील पर्स कडे गेले. त्यांनी हॉर्न वाजवून मोठ्याने आवाज दिला. पण पुढील गाडीचा वेग जास्तीचा असल्याने काही अंतरावर ती पर्स खाली पडली.श्री बरडे यांनी ती पर्स घेऊन पुन्हा आपला जीव धोक्यात घालत सुसाट वेगाने गाडी पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा प्रयत्न असफल झाल्याने सौ.भाग्यश्री शिंदे यांची गाडी पुढे निघून गेली.

दरम्यान, गोरख बरडे यांनी आपल्या कार्यालयात जाऊन पर्सची तपासणी केली असता त्यात आधारकार्ड, पॅनकार्ड व इतर कागदपत्रे तसेच सोन्याचे दागिने, रोख रक्कम रू.पाच हजार असा ऐवज आढळून आला. यात सौ भाग्यश्री शिंदे यांच्या आधार कार्डवर चोपडा येथील त्यांचे वडील शिवाजीराव बाविस्कर यांचा पत्ता होता. त्यानुसार श्री. बरडे यांनी त्यांचे संगमनेर येथील मित्र व चोपडा येथे पशुवैद्यकीय अधिकारी असलेले डॉ.ज्ञानदेव रामनाथ दातीर यांना संपर्क केला. डॉ. दातीर यांनी त्यांचे मित्र किरण क्लासेसचे संचालक राहुल भागवत पाटील (गरताडकर) यांना ही माहिती सांगीतली. त्यानुसार हे दोघेही मित्र शंकर-पार्वती नगरात श्री. बाविस्कर यांचे कडे गेले. त्यांना सर्व हकिकत सांगुन श्री.बरडे,(मोबा.नं.९९७५८७४२०२ )यांचेशी संपर्क साधण्याचे सांगीतले.श्री.बाविस्कर यांना याबाबत काहीच माहीत नसल्याने आधी त्यांनी फोनवर मुलीला विचारणा केली. त्यानुसार मुलीचे जेठ व जेठाणी श्री.व सौ. वैशाली दिनेश शिंदे हे तळेगाव दाभाडे येथे गोरख बरडे यांच्याकडे गेले असता त्यांनी योग्य ती खात्री करून पर्स मधील सर्व वस्तु श्री.व सौ. शिंदे यांच्या ताब्यात दिल्यात.त्या बदल्यात श्री. शिंदे यांनी श्री. बरडे यांना योग्य ते बक्षीस देण्याचा प्रयत्न व आग्रह केला. पण बरडे यांनी एक रुपया बक्षीस न घेता मला फक्त चांगल्या कामासाठी आशिर्वाद व शाबासकी द्या,असे सांगून आपल्या प्रामाणिकपणाचा परिचय दिला.

याबाबत शिवाजीराव बाविस्कर यांनी सर्वांचे विशेष आभार मानले व आज जगभर कोरोनाचा कहर सुरू असतांना प्रत्येक जण अन्न,औषध,आरोग्य व पैसा मिळविण्यासाठी प्रयत्न करित आहेत,परंतु गोरख बरडे यांचेसारखे प्रामाणिक लोक आजही कोरोना वॉरीयर्स म्हणुन निस्वार्थपणे मानवसेवा करित आहेत, त्यांच्या ह्या प्रामाणिकपणाचे खरच कौतुक करावेसे वाटते.

Protected Content