जळगाव, प्रतिनिधी । पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क बाकी असेल तर त्याला तीन ते चार टप्प्यात भरण्याची मुभा द्यावी ही मागणी कबचौ उमविच्या कुलगुरूंनी मान्य करून तसे परिपत्रक काढल्याची माहिती युवासेनेने दिली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने सूचित केल्याप्रमाणे महाविद्यालये, विविध संस्था, शैक्षणिक विभाग प्रमुख यांना तशा सूचना देण्यास सांगितले आहे. याबाबत मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढले असून उमविच्या विद्यार्थ्यांसाठी देखील असे परिपत्रक काढावे अशी मागणी कुलगुरू पी.पी.पाटील यांच्याकडे युवासेनेतर्फे उप जिल्हा युवा अधिकारी पियुष गांधी यांनी केली होती. याविषयी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडेही युवासेनेतर्फे मागणी करण्यात आली होती. करोनाच्या महामारीमुळे आर्थिक संकट खान्देशच्या विद्यार्थ्यांवर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क हे एकरकमी न मागता टप्यांमध्ये मागावे अशी मागणी युवा सेनेचे उपजिल्हा युवा अधिकारी पियुष गांधी यांनी केली होती. त्यावर कुलगुरू पी.पी. पाटील यांनी त्यांना तसे परिपत्रक महाविद्यालयांना काढल्याची माहिती दिली आहे. आपण परीक्षेची फी देखील माफ केली असल्याचे सांगितले. त्यामुळे युवासेनेच्या पाठपुराव्याला यश आले असून विद्यार्थ्यांनी शुल्क तीन ते चार टप्प्यात भरावे असे आवाहन उप जिल्हा युवा अधिकारी पियुष गांधी यांनी केले आहे.