पाचोरा | रेल्वेतून पडलेल्या विद्यार्थ्याचे प्राण वाचवण्यासाठी त्याच रुळावरून देवळाली-भुसावळ पॅसेंजर तब्बल दीड किमी उलट दिशेने धावली.
पाचोरा येथील चिंतामणी कॉलनीतील रहिवासी राहुल संजय पाटील (वय २२) हा विद्यार्थी जळगाव येथील आय.एम.आर. कॉलेजमध्ये बी.सी.ए.चे शिक्षण घेत आहे. तो दररोज रेल्वेने अप-डाऊन करतो. गुरुवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे पाचोऱ्याहून देवळाली-भुसावळ पॅसेंजरने निघाला होता. पॅसेंजरमध्ये गर्दी असल्याने तो दरवाजाजवळ उभा होता. वाटेत माहेजी स्थानकाजवळील रेल्वे खांब क्र. ३८३ जवळ तो धावत्या रेल्वेतून पडल्याने गंभीर जखमी झाला. गाडीतील प्रवाशांसमोर ही घटना घडल्याने ट्रेन लाइव्ह प्रवासी संघटनेच्या सदस्यांनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप पाटील यांना घटनेची माहिती दिली. पाटील यांनी पाचोरा येथील स्टेशन प्रबंधक एस.टी. जाधव यांना घटनेची माहिती दिली. तर जाधव यांनी परधाडे येथील सहायक स्टेशन मास्टर के.जे. बर्डे व माहेजी येथील सहायक स्टेशन मास्टर ए. एस. पाल यांच्याशी व आरपीएफशी संपर्क साधून घटना कळवली. त्यानंतर प्रवाशांनी साखळी ओढून पॅसेंजरला परधाडे ते माहेजीदरम्यान थांबवले. पॅसेंजरचे गार्ड व लोकोपायलट यांनी आपसात चर्चा करून या घटनेची चौकशी केली. प्रशासनाच्या सूचनांवरून जखमीचे प्राण वाचवण्यासाठी गार्ड आणि लोकोपायलट यांनी माणुसकीच्या नात्याने पुढाकार घेतला. त्यामुळे देवळाली पॅसेंजर आहे त्याच रुळांवरून एक ते दीड किमी उलट दिशेने धावली. रेल्वे रुळांलगत जखमी अवस्थेत पडलेल्या राहुल पाटील या विद्यार्थ्याला गाडीत घेऊन पॅसेंजर पुन्हा जळगावकडे मार्गस्थ झाली.या घटनेमुळे पॅसेंजर गाडी परधाडे ते माहेजी दरम्यान ३५ मिनिटे थांबली होती.