नवी दिल्ली, वृत्तसंस्था । सध्या देशात जेईई व नीट परीक्षेच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. र काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्हिडिओ शेअर करत आपली भूमिका मांडली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडीत एखादा निर्णय घ्यायचा असेल, तर तो त्यांना विचारात घेऊनच घ्यायला हवा, असा सल्ला देखील सरकारला दिला आहे.
”माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, तुम्ही या क्षणी कठीण परिस्थितीला सामोरं जात आहात. तुमची परीक्षा केव्हा, कुठं आणि कशी होईल? हे केवळ तुमच्यासाठीच नाहीतर तुमच्या परिवारासाठी देखील महत्वपूर्ण आहे. चांगल्या भारताच्या निर्मितीसाठी आम्ही तुमच्यावर अवलंबून आहोत. तुमच्या भविष्याशी निगडीत कोणता निर्णय घ्यायचा असेल, तर हे महत्वाचे आहे की तुम्हाला विचारात घेऊनच तो घ्यायला हवा. मला अपेक्षा आहे की सरकार तुमचे म्हणने ऐकेल, तुमचा आवाज ऐकेल व तुमच्या इच्छेनुसार काम करेल. हाच माझा सरकारला सल्ला आहे. ”असे त्यांनी म्हटले आहे.
नीट आणि जेईई परीक्षेवर स्थगिती आणली जावी यासाठी सर्वोच्च न्यायालयत पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची तसेच प्रवासात येणाऱ्या अडचणींची दखल घेतली नसल्याचे पुनर्विचार याचिकेत म्हटले गेले आहे. १७ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती.