जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि नोव्होटा थर्मोटेक प्रा. लि.,मुंबई यांच्यात सोमवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. थर्मली इन्सुलेटेड कोटींग संदर्भात हा करार करण्यात आला आहे.
नोव्होटा या कंपनीने त्यांच्या नवीन कार्यात्मक कोटींग विकासनासाठी विद्यापीठाच्या रसायन शास्त्र प्रशाळेकडे मार्गदर्शन आणि सहाय्य प्राप्त होण्यासाठी संपर्क साधला होता. थर्मल इन्सुलेटेड कोटींग संदर्भात व डेटा विकसित करण्यासाठी त्यांना या प्रशाळेकडून सल्ला दिला जाणार आहे. ही कंपनी कोटींग मध्ये अग्रेसर आहे. या सामंजस्य करारामुळे रसायनशास्त्र प्रशाळेतील विद्यार्थ्यांना देखील कोटींगच्या संदर्भात या कंपनीत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या सामंजस्य करारावर विद्यापीठाकडून कुलसचिव डॉ. विनोद पाटील व कंपनीकडून व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चौधरी यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी.इंगळे, प्रशाळेचे संचालक प्रा. डी.एच. मोरे, प्रा. पी.पी. माहुलीकर, प्रा. विकास गीते, प्रा.अमरदिप पाटील यांची उपस्थिती होती.