विद्यापीठात सौर उर्जा प्रकल्पासाठी नियोजन समितीकडून निधी मंजूर – कुलगुरू प्रा. माहेश्वरी

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ६५० किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प आस्थपित करण्यासाठी जळगाव जिल्हा नियोजन समितीने ३ कोटी ६६ लाख ७१ हजार ९६० रूपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र  विद्यापीठात सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यासाठी विद्यापीठाने ९ मार्च २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. जिल्हाधिकारी श्री. अभिजित राऊत यांनी तातडीने याबाबतीत महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) कार्यालयाला सर्वेक्षण व अंदाजपत्रकाचे निर्देश दिले. महाऊर्जाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी तातडीने हालचाली करून सर्वेक्षण तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केल्या नंतर जिल्हा नियोजन समितीच्या लेखाशिर्षातअसलेल्या अपारंपरीक ऊर्जा विकास अनुदान योजनेतून हे अनुदान देण्यास प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. कॅपेक्स मोड (भांडवली खर्चाचे मॉडेल) पध्दती अंतर्गत ६५० किला वॅट क्षमता असलेला पारेषणसंलग्न सौर ऊर्जा प्रकल्प आस्थपित केला जाणार आहे. प्रस्ताव सादर केल्या नंतर अवघ्या पंधरा दिवसांच्या आत प्रशासकीय मान्यता देण्यात आली हे विशेष. या प्रकल्पामुळे विद्यापीठात मोठ्या प्रमाणात विजेची बचत होणार आहे. सद्या विद्यापीठाला सुमारे २ हजार किलो वॅट चा मंजूर अधिभार आहे. हा प्रकल्प सुरु झाल्यानंतर किमान एक तृतीयांश वीजेची बचत होणार आहे. पहिल्या टप्प्यात विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत हा प्रकल्प कार्यान्वीत केला जाणार आहे. निधी प्राप्त झाल्यानंतर लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरूवात होईल. अशी माहिती कुलगुरू प्रा.माहेश्वरी यांनी दिली. या पत्रकार परिषदेला प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.एस. टी. इंगळे, प्रभारी कुलसचिव प्रा. के. एफ. पवार, प्रभारी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. दीपक दलाल, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. सुनील कुलकर्णी, विद्यापीठ कार्यकारी अभियंता इंजि. एस. आर. पाटील हे उपस्थित होते.

Protected Content