विद्यापीठात फुले, आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त कार्यक्रम

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्याबद्दल मोठया प्रमाणात आपण सगळे बोलत असलो तरी आर्थिक स्वातंत्र्याबद्दलही त्याच गांभीर्याने बोलले गेले पाहिजे असे प्रतिपादन सुजात आंबेडकर यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवा निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे अध्यक्षस्थानी होते. सुजात आंबेडकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाचा संदर्भ दिला. सत्ताधाऱ्यांची नियत साफ नसेल तर ते लोकांना न्याय देऊ शकणार नाहीत असे बाबासाहेबांनी १९४९ च्या भाषणात सांगितले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकांना प्रशिक्षित न करता समाजवाद थेापवला गेला. आणीबाणी च्या काळात धर्मनिरपेक्ष हा शब्द तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी आणला. त्या विरुध्दचा राग म्हणून उजव्या विचारसरणीकडे लोक झुकले. शासनकर्ते कोणतेही असो त्यांनी लोकांचे प्रश्न, त्याच्या चर्चा केल्या नाही. आपल्या संकल्पना रुजवण्यात शासकर्त्यांना अपयश आले. आताही सामाजिक पेक्षाही आर्थिक आरक्षणावर भर दिला जात आहे. मोठया प्रमाणात खाजगीकरण सुरु आहे. वंचित समाजाचे संरक्षण काढले जात आहे. बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्याबद्दलही आवाज उठवावा लागेल असे सुजात आंबेडकर म्हणाले.

अध्यक्षीय भाषणात प्रा.एस.टी.इंगळे यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घालणाऱ्या महात्मा फुले यांचे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक चळवळीत मोठे योगदान असल्याचे मत व्यक्त केले. प्रारंभी विचारधारा प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा.म.सु.पगारे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रा.अनिल डोंगरे आणि डॉ.विजय घेारपडे लिखित “स्त्री उद्धारक डॉ.बाबासाहेब आंबेडकर ” या ग्रंथाचे विमोचन झाले. भालचंद्र सामुद्रे यांनी प्रबोधनपर गीत सादर केले. महोत्सवाचे समन्वयक प्रा.रमेश सरदार यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. महात्मा फुले अध्यासन केंद्राच्या प्रभारी प्रमुख डॉ.पवित्रा पाटील यांनी आभार मानले. यावेळी मंचावर प्रा.म.सु.पगारे, प्रा.रमेश सरदार, प्रा.आर.जे.रामटेके, जयंत सोनवणे, डॉ.पवित्रा पाटील हे उपस्थित होते.

Protected Content