जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधरांमधून १० जागा निवडून द्यावयाच्या असून त्यासाठीची नोंदणीकृत पदवीधरांची दुरूस्त मतदार यादी विद्यापीठाने प्रसिध्द केली असून याबाबतीत कुलगुरूंकडे लेखी अपिल नोंदविण्यासाठी १९ डिसेंबर, २०२२ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले आहे.
विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. नोंदणीकृत पदवीधरांमधून अधिसभेवर १० जागा निवडून द्यावयाच्या आहेत. त्यासाठी विद्यापीठाने निर्वाचक गण तयार करण्यासाठीची अधिसूचना यापूर्वीच जारी केली होती. याअनुषंगाने प्राप्त झालेल्या नोंदणीकृत पदवीधर अर्जाद्वारे तात्पुरती निर्वाचक गणांची यादी (तात्पुरती मतदार यादी) विद्यापीठाने दि. ३० नोव्हेंबर २०२२ रोजी प्रसिध्द केली होती. याबाबतीत काही दुरूस्ती/बदल किंवा हरकती /आक्षेप असल्यास लेखी अर्ज आवश्यक त्या पूरक कागदपत्रांसह दि. ८ डिसेंबर, २०२२ पर्यंत सादर करण्याची मुदत दिली होती. प्राप्त झालेल्या कागदपत्रांसह सादर केलेल्या अर्जांची विद्यापीठ शासन अधिसूचना / परिनियमातील निकषांप्रमाणे तपासणी करून योग्य त्या दुरूस्त्या करून निर्वाचक गणांची दुरूस्त मतदार यादी १२ डिसेंबर रोजी विद्यापीठाचे संकेतस्थळ व प्रशासकीय इमारतीच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द केली आहे. या यादीचे अवलोकन करून संबंधितांना याबाबतीत काही विवाद असल्यास कुलगुरूंकडे अपील करता येईल. त्यासाठी सोमवार १९ डिसेंबर, २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यापीठाच्या निवडणूक शाखेत कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपले अपिल सादर करावे. विहित तारीख व वेळ नंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही. असे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विनोद पाटील यांनी कळविले आहे.