जळगाव प्रतिनिधी । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे ऑनलाईन भीमगीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या. दोन फेर्यांमध्ये घेण्यात आलेल्या या ऑनलाइन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारधारा अभ्यासमंडळ, विचारधारा प्रशाळा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त ऑनलाईन भीमगीत गायन स्पर्धा घेण्यात आली. या ऑनलाइन भीमगीत व शाहीरी स्पर्धेत महाविद्यालयीन गटात नागपूरच्या संकेत विरकर याने तर खुल्या गटात डॉ.पंकज गजभिये यांनी प्रथम क्रमांचे पारितोषिक प्राप्त केले.
दोन फेर्यांमध्ये ऑनलाइन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत भारताच्या विविध भागांमधून स्पर्धक सहभागी झाले होते. रविवारी स्पर्धेची अंतिम फेरी झाली. या स्पर्धेचे परीक्षण शाहीर आझाद कोल्हापूरकर, डॉ. अशोक अभंग आणि अमोल जाधव यांनी केले. प्रारंभी भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राचे संचालक डॉ. म.सु. पगारे यांनी कार्यक्रमाची भूमिका विषद केली.
नंतर कुलगुरू प्रा. डॉ. पी. पी. पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ. विजय घोरपडे व वनश्री बैसाणे यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धेचे समन्वयक डॉ. अजय सुरवाडे यांनी आभार मानले. परीक्षकांनी देखील गीत व पोवाडे सादर केले. या वेळी विद्यार्थी, प्राध्यपक व ऑनलाईन उपस्थित होते.
खुल्या गटातून प्रथम पारितोषिक ३१०० रुपये व ई-प्रमाणपत्र- डॉ. पंकज गजभिये (नागपूर), द्वितीय पारितोषिक २१०० रुपये व ई-प्रमाणपत्र राजश्री मराठे (हैद्राबाद), तृतीय पारितोषिक ११०० रुपये व ई-प्रमाणपत्र सपना वाघ, तर उत्तेजनार्थ पारितोषिक ५०० रुपये व ई-प्रमाणपत्र रमेश धुरंधर (मुक्ताईनगर) व विकास जाधव (बुलढाणा) यांनी प्राप्त केले तर महाविद्यालयीन गटात प्रथम पारितोषिक ३१०० रुपये व ई-प्रमाणपत्र नागपूरच्या संकेत विरकर यांना देण्यात आले.