जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सन २०२०-२१ च्या ३०४.५२ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मान्यता देण्यात आली असून यात ३४.९५ कोटी रूपयांची तूट दर्शविण्यात आली आहे.
कुलगुरू प्रा.पी.पी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाची अर्थसंकल्पीय सभा अधिसभा सभागृहात झाली. यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाला मान्यता देण्यात आली. अधिसभेचे सदस्य दीपक बंडू पाटील यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. प्रा. डॉ. पी.पी.माहुलीकर, प्रभारी कुलसचिव प्रा. बी.व्ही.पवार उपस्थित होेते. या अर्थसंकल्पात ३४.९५ कोटी रुपयांची तूट दर्शवली आहे असून गेल्या सात वर्षात यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वाधिक तुटीचा ठरला आहे. तर या अर्थसंकल्पात विद्यापीठ व महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या व विद्यार्थ्यांच्या संशोधनावर भर दिला असून यासाठी १ कोटी ७५ लाखांची तरतुद केली आहे. यात विद्यापीठ व महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या संशोधनासाठी १.५ कोटी तर संशोधक विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी २५ लाखांचा समावेश आहे.
यामध्ये परिरक्षणासाठी १८९.८० कोटी रुपये, योजनांतर्गत विकासासाठी रुपये ५७.४६ कोटी आणि विशेष कार्यक्रम योजनांसाठी ५७.२६ कोटी अशी खर्चासाठी एकूण ३०४.५२ कोटींची तरतूद केली आहे. या अर्थसंकल्पात उत्पन्नाची बाजू २६९.५७ कोटी इतकी असल्यामुळे ३४.९५ कोटी इतक्या तुटीचा हा अर्थसंकल्प आहे.
याप्रसंगी विद्यापीठस्तरीय क्रीडा महोत्सव – १२ लाख, विद्यापीठ परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती – १ कोटी, अत्याधुनिक विश्लेषणात्मक साहित्य इमारतीसाठी – २ कोटी, बहिणाबाई अध्यासन केंद्र – १.५ कोटी, विद्यापीठ व महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या संशोधनासाठी प्रोत्साहनपर अनुदान – १.५ कोटी. विद्यार्थी व विद्यार्थीनी वसतीगृहांसाठी – ३५ लाख, ज्ञानस्त्रोत केंद्र – २६ लाख, सिलेज उपक्रमांतर्गत प्रस्तावित नाविन्यपूर्ण प्रकल्पांसाठी – १ कोटी ५ लाख, बहिणाबाईंच्या जन्मदिन आयोजित साहित्य संमेलनासाठी – ५ लाख; विद्यापीठ प्रशाळा व उपकेंद्र – १३.१९ कोटी, संशोधक विद्यार्थ्यांसाठी सुविधा – २५ लाख, विद्यार्थी कल्याण, क्रीडा, वसतिगृहातंर्गत विविध योजना – ८.३७ कोटी, क्रीडा अंतर्गत असलेल्या १३ योजनांसाठी – १० लाख अशा खर्चाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.
या अर्थसंकल्पानंतर झालेल्या चर्चेत सतीश पाटील, दिलीप पाटील, विष्णू भंगाळे, नितीन ठाकूर, गौतम कुवर, अमोल सोनवणे, आदींसह प्राचार्य आर.एस. पाटील, प्रा.संजय सोनवणे, अमोल मराठे, दिलीप पाटील, दिनेश नाईक, एकनाथ नेहेते, के.जे. कोल्हे आदींनी भाग घेतला.