पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वैद्यकीय शिक्षणासाठी किर्गीस्थान येथे ॲडमिशन घेवून देतो असे सांगून तरूणाची ३ लाख १० हजारांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी १६ मार्च रोजी पहूर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहूर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, सौरभ वसंत काळे (वय-२५) रा. राम मंदीर, सोयगाव, जि.औरंगाबाद हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे असतांना त्याची दिव्य रंजन प्रसाद रा. जोधपूर याच्याशी ओळख निर्माण झाली. दरम्यान, सौरभला वैद्यकीय शिक्षण घ्यायचे होते. त्यामुळे दिव्य प्रसाद याने एमबीबीएस शिक्षणासाठी किर्गीस्थान येथे ॲडमीशन घेवून देतो असे सांगून वेळोवेळी सौरभकडून फोन-पेच्या माध्यमातून एकुण ३ लाख १० रूपये घेतले. परंतू ॲडमिशन करून दिले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सौरभने पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिव्य रंजन प्रसाद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहे.