पंढरपूर, वृत्तसंस्था । राज्य सरकारने धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिल्यानंतर विठ्ठल मंदिर येथे विठुरायाच्या पायावरील दर्शन काही दिवस बंद ठेवले तरी चालेल मात्र देवाच्या पायावर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर टाकण्यास आमचा ठाम विरोध राहील, अशी भूमिका वारकरी संप्रदायाने घेतली आहे.
विश्व वारकरी सेना वंचित बहुजन आघाडीच्या सोबतीने १ लाख वारकरी घेऊन विठ्ठल मंदिर प्रवेशाचे आंदोलन करणार आहे. भाजपनेही या मुद्द्यावर राज्यभर घंटानाद आंदोलन पुकारले आहे सर्वच पक्षातील राजकीय नेते मंदिर उघडण्याबाबत आता आक्रमक होऊ लागले आहेत. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात चरणांवर दर्शन असल्याने याबाबत वेगळा प्रश्न उभा राहणार आहे. एखाद्या करोनाग्रस्त भाविकाने विठुरायाच्या चरणांवर माथा टेकून दर्शन घेतल्यास त्यानंतर येणाऱ्या भाविकालाही संसर्गाची भीती निर्माण होऊ शकते. हे टाळण्यासाठी देवाच्या पायावर सॅनिटायझर फवारावे लागेल यालाच वारकरी संप्रदायाने विरोध दर्शविला आहे.
वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, कुंभारगावकर महाराज, लबडे महाराज, विनायक महाराज गोसावी, रामकृष्ण महाराज यांनी संकट संपेपर्यंत पायावर दर्शनाऐवजी मुखदर्शन सुरू केले तरी चालेल, असे सांगत पायावर सॅनिटायझर मारण्यास विरोध दर्शवला आहे. वारकरी संप्रदायात मद्य निषिद्ध असताना अल्कोहोल असलेले सॅनिटायझर देवाच्या पायावर मारणे वारकरी संप्रदायाला अमान्य असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्या पंढरपूरचे महत्त्व देवाच्या पायावर दर्शनाने इतर देवस्थानांपेक्षा जास्त असते त्याच दर्शनाचा त्याग करायची मानसिकता संप्रदायाने केली आहे. कोरोनाच्या संकटकाळात सकारात्मक ऊर्जा मिळण्यासाठी भजन-कीर्तनास परवानगी मिळावी ही आग्रही मागणी वारकरी करीत आहेत.