विजय निश्चित आपला ; हताश होऊ नका

साताराः वृत्तसंस्था । मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या विवेक राहाडे या विद्यार्थ्याला श्रद्धांजली वाहताना खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा समाजाला आवाहन केलं आहे. ‘आजची परिस्थिती आपल्या विरोधात वाटत असली तरी न्यायालयात ताकदीने आपण लढा देत आहोत विजय निश्चित आपला होईल,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळं नैराश्य आलेल्या बीडमधील एका विद्यार्थ्यांना गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनीही ट्विटरच्या माध्यमातून त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. ‘विवेक रहाडे या बांधवाने आरक्षण न मिळाल्यामुळं आत्महत्या केली. रहाडे परिवारासाठी ही कधीही भरून न निघणारी हानी आहे. समाजातील नवयुवकांना आमचे आवाहन आहे. नवयुवकांनी असे पाऊल उचलणे हे राष्ट्राच्या व समाजाच्या दृष्टीने हानिकारक आहे, असा धीर सोडून व टोकाचा निर्णय घेऊन चालणार नाही आणि त्यातून काही निष्पन्न होणार नाही,’ असं अवाहन उदयनराजे यांनी केलं आहे.

 

‘मराठा आरक्षणाबाबत समाजाच्या भावना तीव्र व भावनिक आहे हे मान्य आहे त्यासाठी आत्महत्या हा पर्याय असूच शकत नाही. आजची परिस्थिती जरी आपल्या विरोधात वाटत असली तरी न्यायालयात मोठ्या ताकदीने आपण लढा देत आहोत त्यामुळं विजय निश्चित आपला होईल.’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Protected Content