मुंबई प्रतिनिधी । फार पूर्वी ‘थोरातांची कमळा’ हा चित्रपट गाजला होता. आता मात्र ‘विखे-पाटलांची कमळा’ हा चित्रपट आला व पडल्याचे नमूद करत विखेंची टुर अँड ट्रॅव्हल कंपनी बंद पडली असल्याचा जोरदार टोला आज शिवसेनेने लगावला आहे.
सध्या महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यातील वाद रंगले असून सामनाचे मुखपत्र असणार्या दैनिक सामनामध्ये यावर जोरदार भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, काचेच्या घरात राहणार्यांनी दुसर्यांच्या घरावर दगड मारू नयेत हा साधा नियम विखे-पाटील विसरले आहेत. लाचारी आणि बेईमानी हे शब्द कुणासाठी वापरावेत यावर राजकारणात आचारसंहिता निर्माण होणे गरजेचे आहे. विखेंसारखे नेते थोरातांवर लाचारसारखे शब्दबाण सोडतात तेव्हा त्यांच्या विसराळूपणाचे कौतुक वाटते. महाविकास आघाडी ही स्थिर आणि मजबूत असल्याची ग्वाही थोरात यांनी दिल्यावर विखे यांच्या पोटात खळबळ माजण्याचे कारण काय ? असा खडा सवाल यात उपस्थित करण्यात आला आहे.
अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, विखे-पाटलांनी काँग्रेसचा त्याग केल्याने त्यांचे नुकसान झाले नाही अन् भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांची ताकद दिडकीनेही वाढली नाही. त्यांनी पलायन केले नसते ते ते आज सरकारमध्ये मंत्री असते. आज हेच पद थोरात यांना मिळाल्याने त्यांची तगमग सुरू आहे. महाराष्ट्राचे ठाकरे सरकार स्थिर आहे. एकमेकांचा मानसन्मान राखत राज्यशकट हाकले जात आहे. फार पूर्वी ‘थोरातांची कमळा’ हा चित्रपट गाजला होता. आता ‘विखे-पाटलांची कमळा’ हा चित्रपट आला आणि पडला. काँग्रेसची खाट कुरकुरतेय की नाही ते आम्ही पाहू. पण विखेंची ‘टुर अँड ट्रॅव्हल कंपनी’ बंद पडली असली तरी त्यांची टुरटुर सुरू आहे. हे त्यांचे वैफल्य असल्याचा टोला या अग्रलेखात मारण्यात आला आहे.