जळगाव, प्रतिनिधी । शहर मनपाला सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या ४२ कोटींच्या कामांचा प्रस्ताव लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाशिक मुख्य अभियंत्यांकडे पाठवावा यासाठी महापौर भारती सोनवणे यांच्यासह मनपा पदाधिकाऱ्यांनी जळगावच्या मुख्य अभियंत्यांची भेट घेतली.
जळगाव शहराच्या विकासासाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत जळगाव मनपाला १०० कोटींचा विशेष निधी मंजूर करण्यात आला होता. नुकतेच त्या निधीपैकी मंजूर ४२ कोटींच्या कामावरील स्थगिती शासनाने उठवली होती. पंधरा दिवसापूर्वी महापौरांसह पदाधिकाऱ्यांनी कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत पाटील यांची भेट घेतली होती. त्यांनी सुचविलेल्या निर्देशानुसार मनपा प्रशासनाकडून सदरील कामे करण्यासाठी ५.१० कोटींच्या निधीची तजवीज नगरविकास विभागाने करून ठेवली असल्याचे पत्र सार्वजनिक विभागाला देण्यात आले होते.
पत्राच्या अनुषंगाने सोमवारी महापौर भारती सोनवणे, उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, स्थायी समिती सभापती ऍड.शुचिता हाडा, नगरसेवक कैलास सोनवणे, कुलभूषण पाटील, अतुलसिंग हाडा, मनोज काळे, गजानन देशमुख आदींनी मुख्य अभियंता प्रशांत सोनवणे यांची भेट घेतली. मनपा प्रशासनाकडून निधीच्या तरतुदीचा तपशील देण्यात आला असून आपण लवकरात तसा प्रस्ताव तयार करून नाशिक मुख्य अभियंत्यांकडे पाठवावा असे मनपा पदाधिकाऱ्यांनी सांगितले.