जळगाव प्रतिनिधी । गाय, वासरू आणि गोऱ्हांची चारचाकी वाहनातून निर्दयीपणे व बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या तिघांवर शहर पोलिसात मध्यरात्री गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राजेंद्र देविदास नन्नवरे व योगेश भिकन पगारे हे गुरुवारी रात्री ११ वाजता जेवण झाल्यानंतर शतपावली करीत असताना शिवाजी नगर स्मशानभूमीजवळ चारचाकी मालवाहू वाहन क्रमांक (एमएच १९ बीएम ८१८८) तून गाय, वासरू आणि गोऱ्हा यांची वाहतूक करतांना गुरांच्या ओरडण्याचा आवाज आला. हे वाहन थांबवून चालकाची चौकशी केली असता त्याच्याकडे गुरे बेकायदेशीर व वाहनात निर्दयीपणे कोंबून भरलेली होती. त्यामुळे हे वाहन शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दीड लाख रुपये किमतीचे वाहन व गुरांना ताब्यात घेतले आहे. त्याची किमंत १ लाख ८३ हजार रुपये इतकी आहे. गुरांची निर्दयीपणे वाहतूक करणारा चालक नदीमखान समदखान (२२, रा.हुडको,शिवाजी नगर) व त्याच्यासोबत असलेल्या समशेरखान धासीखान (४०, रा.सीटी कॉलनी,गेंदालाल मील) व प्रफुल्ल संभाजी शिंदे (३४, रा.शांती नगर) या तिघांविरुध्द राजेंद्र नन्नवरे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.