वाशिममध्ये निवासी शाळेतील २२९ विद्यार्थी कोरोनाबाधित !

 

वाशीम : वृत्तसंस्था । जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील देगाव येथील आदिवासी निवासी शाळेतील चार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व वसतीगृहात राहणारे तब्बल २२९ विद्यार्थी दोन दिवसांत कोरोनाबाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

 

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी तातडीने या निवासी शाळेला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

 

देगाव येथील आदिवासी निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना लक्षणे आढळून आल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी दोन दिवसांमध्ये चार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि २२९ विद्यार्थी बाधित आढळून आले आहेत. भावना पब्लिक स्कूल येथील वसतीगृहाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. बाधित आढळलेले सर्व विद्यार्थी शाळेच्या वसतिगृहात निवासी स्वरुपात राहणार आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्याातील १५१, यवतमाळ जिल्ह्याातील ५५, वाशीम जिल्ह्याातील ११, बुलढाणा जिल्ह्याातील तीन, अकोला जिल्ह्याातील एक, हिंगोली जिल्ह्याातील आठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

 

 

 

या  विद्यार्थ्यांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाने दोन डॉक्टरांसह दोन आरोग्य पथके निवासी शाळेमध्ये तैनात ठेवावीत. शाळा व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांचे एक पथक ठेवावे. कोणत्याही विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेऊन गट शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आढावा घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

 

शाळेमध्ये निवासी स्वरुपात राहणाऱ्या व बाधा न झालेल्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. बाधित आढळलेल्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेले इतर स्थानिक विद्याार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची चाचणी करण्यात येणार आहे. बाधित विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना थोडीशी सर्दी आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना कोणतेही लक्षणे अथवा त्रास जाणवत नसल्याचे आरोग्य अधिकाºयांनी सांगितले आहे.

 

 

 

वाशीम जिल्ह्यामध्ये उद्रेक वाढत असून बुधवारी तब्बल ३१८ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये देगाव येथील निवासी शाळेतील १९० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात एका बाधिताचा मृत्यू झाला असून ३० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली.

 

Protected Content