वाळू ट्रॅक्टर पळविले : तब्बल दोन महिन्यांनी फिर्याद

पारोळा प्रतिनिधी । महसूल प्रशासनाच्या ताब्यात असणारे ट्रॅक्टर पळवून नेल्या प्रकरणी दोन महिन्यांनी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर हे महसूलच्या पथकाने सात महिने पूर्वी पकडून ताब्यात घेतले होते. ते ट्रॅक्टर मालकाने विना परवानगी पळवून नेल्याची बाब २ जानेवारी रोजी महसूलच्या लक्षात आली. त्या अनुषंगाने तब्बल दोन महिन्यानंतर संबंधीत मालकाविरुद्ध नायब तहसीलदार यांनी फिर्याद दिल्या नंतर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सर्रासपणे अवैध वाळू वाहतुक ही नित्याची सुरू आहे. बोरी नदीसह भडगाव तालुक्यातील गिरणा नदीतील अवैधरित्या वाळू ही शहरासह ग्रामीण भागात राजरोसपणे येत आहे. त्या अनुषंगाने महसूलच्या पथकाने १० मे २०१९ रोजी चोरवड येथे उमेश केशव गायकवाड (राहणार भडगाव) यांच्या मालकीचे अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर व ट्रॉली ही पकडून ताब्यात घेतली होती. याचा पंचनामा करून ते वाहन पोलीस लाईन पारोळा आवारात उभे केले होते. ते वाळूचे भरलेले ट्रॅक्टर ट्रॉली ही दोन जानेवारी २०२० रोजी पळवून नेल्याची बाब शहर तलाठी यांच्या निदर्शनास आली होती. तहसीलदार अनिल गवांदे यांनी याची पडताळणी केली.

त्या अनुषंगाने बुधवारी नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी यांनी ट्रॅक्टर मालक उमेश गायकवाड यांच्या विरुद्ध जागेवरून संमतीविना बेकायदेशीर रीत्या महसूलच्या ताब्यातून तीन लाख रुपये किंमतीचे वाहन पळवून नेल्याप्रकरणी फिर्याद दिल्याने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वाहन चोरीची घटना ही दोन महिन्यापूर्वी उघडकीस येऊन देखील तिला तब्बल एवढ्या उशिरा ने का गुन्हा नोंदवण्यात आला याविषयी विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत. तालुक्यातील बोरी नदीपात्रात प्रमाणात अवैधरित्या वाळू वाहतूक सुरूच आहे अवैधरित्या वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाच पुरेसे नियंत्रण व वचक नसल्याने शासनाचे रोजचा लाखो रुपयांचा गौण खनिज हे चोरीस जात आहे. यातच उशीरा तक्रार करण्याचे कारण काय ? हा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

Protected Content