चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील गोरगावले बुद्रुक येथील ग्रामस्थांना वाढीव वीज बिले पाठविण्यात आले असून याची त्वरीत दुरूस्ती करावी, अन्यथा आपण ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी सरपंच तथा भाजपचे माजी तालुकाध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर यांनी दिला आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, गोरगावले बुद्रुक येथे भटक्या समाजातील गरिब व्यक्तीस एक महिन्याचे रू.चारशे ते पाचशे मात्र वीज बिल यायचे. लॉकडाऊन काळात तेच विजबिल तीन महिन्यांचे रू.चार ते पाच हजार मात्र आलेले आहे. आधीच्या विज बिला नुसार ते फक्त रु. बाराशे ते पंधराशे मात्र यायला पाहिजे होते. म्हणजेच सुमारे रू.अडीच ते तीन हजार मात्र वीजबिल जास्तीचे आलेले आहे. ती व्यक्ति हे विजबिल भरूच शकत नाही. त्यांच्याजवळ साधा मोबाईल असल्याने सदर व्यक्तीला ऑनलाईन मिटर रीडिंग पाठवता आले नाही. त्यांना मागील महिन्याचे सरासरी वीजबिल करून पाठवणे गरजेचे होते. ज्यांनी ऑनलाईन मिटर रिडिंग पाठवले आहे, त्यांना नियमानुसार बिल आकारणीस हरकत नाही. ही परिस्थिती तालुक्याभरातील विज ग्राहकांची झाली आहे. विजबिल दुरुस्तीसाठी संबंधित विभागाकडे गेले असता तेथील अधिकारी, कर्मचारी आधी पूर्ण विजबिल भरायला सांगतात. ही एक प्रकारे वीज ग्राहकांची लूटच आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, मागील वर्षी ग्रामीण व शहरी भागात तसा आदेश नसतांना महावितरणकडून चालु व सुरू असलेले मीटर काढून नवीन जास्तीचे विजबिल आकारणी करणारे मीटर बसविण्यात आलेले आहेत. इतर तालुक्यात वीज ग्राहकांनी याबाबत आंदोलन केले. त्याला तेथील सामा.संस्था संघटना,सर्व पक्षिय पदाधिकारी,लोकप्रतिनिधी यांनी पाठिंबा दिला, त्या ठिकाणी ही मोहीम थांबवण्यात आली होती. आताही इतर तालुक्यात वाढीव वीजबिलांबाबत विरोध होताच तिथे जास्तीचे विजबिले महावितरण कंपनी कडुन दुरुस्त व कमी करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे चोपडा तालुक्यात सुद्धा महावितरण कंपनीने वाढीव वीज बिलांची त्वरित दुरुस्ती करावी, अन्यथा तालुक्यातील ग्राहकांतर्फे तहसील कार्यालयासमोर तिव्र ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपाचे माजी विधानसभा क्षेत्रप्रमुख व मार्केट कमिटीचे माजी संचालक जगन्नाथ टि. बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) यांनी या पत्रकान्वये दिला आहे.