नवी दिल्ली वृत्तसंस्था । आज सायंकाळी जाहीर करण्यात आलेल्या पद्मश्री पुरस्कारांमध्ये ख्यातनाम गायक सुरेश वाडेकर, बीजमाता राहीबाई पोपरे आणि हिवरेबाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांचा समावेश आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या बीजमाता राहीबाई पोपरे आणि अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरेबाजाराचे माजी सरपंच पोपटराव पवार यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. हायब्रीड वाण आणि रासायनिक शेती यामुळे कुपोषणासहित आरोग्याच्या इतर समस्या वाढल्याने विषमुक्त शेतीसाठी कृतिशील प्रयत्न राहीबाई करतात. गावरान वाण शोधणे, लागवड करणे, त्यांच्या बिया काढून संकलित करणे, इतरांना पेरणीसाठी प्रेरणा देणे, त्यांच्या माध्यमातून पुन्हा बियांचे संकलन करणे अशा पद्धतीने त्यांच्या बीजबँकेचा विस्तार सुरू आहे. आतापर्यंत ५४ पिकांच्या ११६ वाणांच्या गावरान बियांचे जतन त्यांनी केले आहे.
अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरेबाजारचे माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांनी जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. खरीप व रब्बी पिकांसाठी तसेच ग्रामस्थांच्या पिण्यासाठीची वार्षिक गरज तसेच पाळीव जनावरांना पिण्यासाठीची गरज लक्षात घेऊन यंदाच्या पावसाळ्यात गावात पडलेल्या पाण्याचे नियोजन पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते.
दरम्यान, ख्यातनाम गायक सुरेश वाडेकर यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा सन्मानदेखील पद्मश्री पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.