नगरदेवळा ता.पाचोरा, प्रतिनिधी | खांदेशात कानुबाई उत्सवाच्या वेळेस गायला जाणाऱ्या “वहिगायन’ या लोककलेला राजमान्यता मिळवून देण्यासाठी विधानसभेत आवाज उडवणार असल्याचे प्रतिपादन आ. किशोर अप्पा पाटील यांनी केले आहेत.
तालुक्यातील नगरदेवळा येथे खान्देश लोककलावंत विकास परिषद व साई शक्ती वही मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खांदेशातील वहिगायन लोककलावंतांचा विभागीय १५ वा मेळावा रविवार रोजी शेकडो लोककलावंतांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भडगांव पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोरआप्पा पाटील, प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना गटनेते रावसाहेब पाटील , महिला सरपंच प्रतिक्षा काटकर, स्वागताध्यक्ष लोकशाहीर शिवाजीराव पाटील व प्रमुख मार्गदर्शक म्हणून परिषदेचे जळगांव जिल्हा अध्यक्ष विनोद ढगे हे उपस्थित होते. शाहीर शिवाजीराव पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी लोककलावंतांच्या समस्यांना शासन स्तरावर नक्कीच मांडले जाईल व वहिगायन या कलाप्रकारास राजमान्यता मिळवून देण्यासाठी वेळ प्रसंगी विधानसभेत आवाज उठवु. व पाचोरा येथे तालुक्यातील लोककलावंतांच्या कला सादरीकरणासाठी येण्याजाण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून पाचोरा शहरात लवकरात लवकर लोककलाभवन निर्मिती साठी प्रयत्न केले जातील. असे आश्वासन आमदार किशोर पाटील यांनी दिले. तसेच लोककलेच्या राष्ट्रीय निवड समितीवर कार्यरत नगरदेवळा येथील शाहीर शिवाजी पाटील यांचे राहते घर पावसात पडून ते बेघर झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात झळकल्या होत्या. या बातम्यांची दखल घेऊन शाहीर शिवाजी पाटील यांचे घर शासकीय मदतीतून किंवा आमच्या मित्रपरिवाराच्या मदतीतून लवकरच बांधून देऊ असा विश्वास आमदार पाटील यांनी दिला. सरपंच काटकर यांनी वहिगायन या कलेमुळेच कानबाई उत्सवात खरी रंगत निर्माण होत असते असे सांगितले. दिवसभराच्या या कार्यक्रमास उपस्थित वहिगायन मंडळांनी आपापल्या कला सादर केल्या. व प्रत्येक मंडळास प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राचे सुत्रसंचालन संजीव बावसकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर महाजन , दिपक पाटील, किरण पाटील, भरत चौधरी ,गोरख महाजन ,शुभम शेलार , गजानन तावडे,राजेंद्र पाटील, मनोज पाटील, कैलास महाजन , भागवत महाजन ,बबलू महाजन ,सागर पाटील,संतोष महाजन ,सीताराम महाजन यांनी परिश्रम घेतले .