वर्षभर नवे कृषी कायदे लागू करू द्या — राजनाथसिंह

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । “कृषी कायद्यांना एका वर्षांसाठी लागू करु द्या. जर हे कायदे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरले नाहीत तर आम्ही त्यामध्ये नक्कीच संशोधन करण्यासाठी तयार आहोत,” असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

कृषि कायद्यांवरुन दिल्लीच्या सीमांजवळ सुरु असणाऱ्या आंदोलनाला आज एक महिना पूर्ण झाला आहे. आपल्या मागण्या मान्य करण्यावर शेतकरी अडून बसले आहेत. कृषी कायद्यांसंदर्भात पहिल्यांदाच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

शुक्रवारी एका सभेला संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी, “मी आंदोलन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांवर चर्चा करण्यासाठी पुढे यावं असं आवाहन करतो. चर्चेमधून आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. शेतकऱ्यांसोबत चर्चा सुरु रहावी अशी पंतप्रधानांची इच्छा आहे,” असंही सांगितलं. त्याचप्रमाणे, “आमचं सरकार असा कोणताही निर्णय घेणार नाही जो शेतकऱ्यांच्या हिताचा नसेल,” असा विश्वासही राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. जे लोकं आंदोलन करत आहेत ते सर्व शेतकरी कुटुंबातील असून आम्हाला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे, असंही राजनाथ यांनी स्पष्ट केलं.

मी स्वत: शेतकऱ्याचा मुलगा आहे. मोदी सरकार असं काहीही करणार नाही जे शेतकऱ्यांच्या हिताचं नसेल अशी भावनिक सादही राजनाथ यांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना घातली. सध्या एका वर्षासाठी हे नवे कृषी कायदे लागू होऊ द्या. याकडे एक प्रयोग म्हणून पाहा. जर हे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरले नाही तर सरकार नक्कीच आवश्यक ते संशोधन करण्यास तयार आहे, असंही राजनाथ यांनी सांगितलं. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट, तिप्पट आणि चौप्पट करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असंही राजनाथ सिंह म्हणाले.

पंतप्रधानांना शेतकऱ्यांशी सरकारने चर्चा सुरु ठेवावी असं वाटतं. त्यामुळेच तुम्हाला सरकारने चर्चेसाठी आमंत्रण पाठवल्याचंही राजनाथ यावेळी म्हणाले. कृषी कायद्यांवर खुलेपणे चर्चा करण्यासाठी शेतकऱ्यांनाही पुढाकार घ्यावा अशी विनंती राजनाथ सिंह यांनी केली आहे.

 

किमान आधारभूत मूल्य कायम राहणार असून त्यासंदर्भात संभ्रम निर्माण केला जात असल्याचेही राजनाथ सिंह यांनी सांगितलं. “पंतप्रधान मोदींनी अनेकदा एमएसपी कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मी माझ्यावतीनेही शब्द देतो की एमएसपी कायम राहील,” असं राजनाथ म्हणाले.

भारताचे माजी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपाने देशभरामध्ये थेट शेतकऱ्यांशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमाची आजपासून सुरुवात केली आहे. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून राजनाथ सिंह यांनी दिल्लीतील द्वारका येथील सभेत आपलं मत व्यक्त केलं.

Protected Content