भुसावळ प्रतिनिधी । आगामी काळात तालुक्यातील महत्त्वाच्या वरणगाव नगरपरिषदेची निवडणूक होऊ घातली असून या निवडणुकीबाबत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व स्थानिक पदाधिकार्यांनी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांची भेट घेतली. ही निवडणूक काँग्रेस सर्व शक्तीनिशी लढण्याचा मानस डॉ. पाटील यांनी बोलून दाखविला.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशान्वये व जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार काँग्रेसचे भुसावळ तालुकाध्यक्ष पंकज पाटील यांनी आज दुपारी डॉ. उल्हास पाटलांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली. केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी कृषि कायद्यांमुळे देशभरातील शेतकर्यांत व सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र भावना आहेत. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसला पूरक वातावरण तयार होत आहे. वरणगाव नगरपरिषदेत पाच वर्षांपासून भाजपची सत्ता असून हे शहर विकासापासून वंचित राहिल्याने आता काँग्रेस सक्षम पर्याय म्हणून याठिकाणी निवडणूक लढेल आणि चांगली कामगिरी करेल, असा विश्वास या बैठकीतून व्यक्त करण्यात आला. यावेळी भुसावळ तालुकाध्यक्ष पंकज पाटील यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खा. डॉ.उल्हास पाटील, उत्तर महाराष्ट्र काँग्रेस समन्वयक योगेंद्रसिंग पाटील, वरणगाव शहराध्यक्ष अश्फाक काझी, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, काँग्रेस कार्यकर्ते नितीन पटाव आदी उपस्थित होते.