वरणगाव ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टर नियुक्त करा ; शहर राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

 

वरणगाव, प्रतिनिधी । येथील ग्रामीण रूग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टरची नेमणूक करण्यात यावी. तसेच वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी रूग्णालय ‘कोविड सेंटर’ साठी शासनाने ताब्यात घ्यावे. रुग्णकल्याण समिती बरखास्त करून नवीन स्थापन करावी, अशा विविध मागणीचे निवेदन बुधवारी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.राजेश टोपे यांना देण्यात आले.

जळगाव जिह्यात कोरोनाच्या आढावा बैठकीसाठी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे हे बुधवारी जळगाव दौऱ्यावर आले होते. भुसावळमध्ये कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर भुसावळलाही कोरोनाची आढावा बैठक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली. बैठक आटोपून अकोला येथे जात असतांना वरणगावला शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे ना.टोपे यांना निवेदन देण्यात आले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.रवीन्द्रभैय्या पाटील, माजी आमदार संतोष चौधरी उपस्थित होते. निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, भुसावळ तालुक्यात वरणगाव हे सर्वात जास्त लोकसंख्येचे शहर आहे. येथे ग्रामीण रुग्णालय असून या ठिकाणी एकही डॉक्टर कायमस्वरूपी राहत नाही. शहाराजवळु राष्ट्रीय महामार्ग असल्याने येथे रोज लहान मोठे अपघात होत असतात. त्या अनुषंगाने ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध असणे गरजेचे आहे. तसेच कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूने सर्व जगाला ग्रासले आहे. वरणगावमध्य सुध्दा पॉझीटीव्ह रुग्ण आढळत आहे. त्यांना भुसावळ किंवा जळगावला पाठविले जाते. वरणगाव परिसरातील पॉझिटीव्ह रुग्णांसाठी ऑर्डनन्स फॅक्टरीचे रुग्णालय ‘कोविड सेंटर’ करून शासनाने ताब्यात घ्यावे. त्या रुग्णालयात सर्व सुविधा आणि प्रशस्त असल्याने कोरोना रूग्णांना त्याचा लाभ होईल असेही निवेदनात नमूद केले आहे.

रुग्णकल्याण समिती नवीन स्थापन करा

वरणगाव ग्रामीण रुग्णालयातील रुग्णकल्याण समिती हि 10 वर्षापासून आहे. ती समिती बरखास्त करून नवीन रुग्ण कल्याण समिती स्थापन करण्यात यावी, अशीही मागणी केली आहे.

रुग्णांकडून स्टाफ पैसे उकळतात

कोरोना सारख्या परिस्थितीत ग्रामीण रुग्णालयातील स्टाफ आलेल्या रुग्णांकडून फिटनेस दाखला आणि इतरही दाखल्यांसाठी अवाजवी पैसे उकडतात. तसेच रुग्णालयातील जबाबदार डॉक्टराना अत्यावश्यक फोन केल्यास डॉक्टर फोन उचलण्याची तसदी सुद्धा घेत नाही. या सर्व गंभीर प्रकाराकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लक्ष देऊन दखल घ्यावी असेही निवेदनात नमूद केले आहे.निवेदन देतेवेळी निवेदनावर नगरपरिषदेचे गटनेते नगरसेवक राजेंद्र विश्वनाथ चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक हरी मराठे, वरणगाव शहराध्यक्ष संतोष बळीराम माळी, नगरसेवक विष्णू नेमीचंद खोले, रवींद्र शांताराम सोनवणे, गणेश सुपडु चौधरी, समाधान जगदेव चौधरी, ओबीसी तालुकाध्यक्ष गजानन वंजारी, माजी ग्रा. पं. सदस्य प्रकाश नारखेडे, राजेश पंडित चौधरी, अल्पसंख्याक जिल्हा संघटक पप्पू जकातदार, युवक शहराध्यक्ष प्रशांत मोरे, अनिल हुकूमचंद चौधरी, आरिफ खान चायवाले, जावेद खान, नाना माळी, वाय. आर. पाटील सर, आर.के.चौधरी यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहे.

Protected Content