Home Cities भुसावळ वरणगावमध्ये शिवसेनेचा वीज वितरण कार्यालयावर भव्य धडक मोर्चा; दोन तास ठिय्या आंदोलन

वरणगावमध्ये शिवसेनेचा वीज वितरण कार्यालयावर भव्य धडक मोर्चा; दोन तास ठिय्या आंदोलन

0
8


वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहर व ग्रामीण भागातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, वाढीव व अन्यायकारक वीजबिले, शेतातील ट्रान्सफॉर्मर वारंवार जळणे तसेच स्मार्ट मीटर बसविण्याच्या विरोधात शिवसेनेतर्फे वीज वितरण कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर कार्यालयाबाहेर तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या वीज समस्यांकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. सकाळी १० वाजता बस स्टँड चौकातील शिवसेना संपर्क कार्यालयापासून या मोर्चाची सुरुवात झाली. मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी, महिला, युवक आणि शिवसेना पदाधिकारी सहभागी झाले होते. हातात भगवे झेंडे आणि सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला. बस स्टँड ते वीज वितरण कार्यालय असा पायी मोर्चा काढण्यात आला असून संपूर्ण मार्गावर नागरिकांचे लक्ष वेधले गेले.

वीज वितरण कार्यालयावर पोहोचल्यानंतर आंदोलन अधिक तीव्र झाले आणि कार्यालयाबाहेरच दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा शिवसेनेने घेतला होता. यावेळी उपकार्यकारी अभियंता ग्रामीण एस. सी. पंचबुद्गे आणि शहर अभियंता ए. बी. कुंभारे यांच्याशी चर्चा झाली. वाढीव वीजबिले कमी करणे, शेतातील ट्रान्सफॉर्मर तत्काळ दुरुस्त करणे, खंडित वीजपुरवठा सुरळीत करणे तसेच स्मार्ट मीटर जबरदस्तीने न बसविणे याबाबत लेखी आश्वासन देण्यात आले.

गरिबांच्या घरात कोणतेही जास्त उपकरणे नसतानाही तब्बल ४० हजार रुपयांपर्यंत वीजबिले आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच कमी दाबाने वीजपुरवठा आणि सतत होणाऱ्या बिघाडामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले. पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या मध्यस्थीनंतर आणि प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. अन्यथा रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता. लेखी आश्वासनात वीजबिल तपासणी करून दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर तातडीने दुरुस्ती आणि वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची हमी देण्यात आली. त्यानंतर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात जिल्हाप्रमुख समाधान महाजन, कामगार नेते मिलिंद मेढे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound