जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वानखेडे हाऊसिंग सोसायटी येथे राहणाऱ्या वयोवृध्द महिलेसह तिच्या मुलाची अज्ञात व्यक्तीने १ लाख ९० हजारांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बुधवार ५ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुनंदा बाबुराव तायडे (वय-६२) रा. वानखेडे हाऊसिंग सोसायटी, जळगाव या वयोवृध्द महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २२ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अनोळखी नंबरवरून फोन आला. नेट बँकीने पैसे पाठवायचे सांगून वयोवृध्द महिला आणि तिचा मुलगा विजय बाबुराव तायडे यांच्या बँक खात्यातून परस्पर पैसे वर्ग करून १ लाख ९० हजारांची ऑनलाईन फसवणूक केली. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने मुलासह जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी ५ एप्रिल रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख करीत आहे.