यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील वनोली गावातील स्वस्त धान्य दुकानात रेशन कार्डधारकांना धान्य कमी देणे, यादीत नाव असूनही लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित ठेवणे आदी प्रकारच्या तक्रारी असल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी तपासणी करून प्राधिकार पत्र आज रद्द केले.
वनोली येथील स्वस्त धान्य दुकानदार अंबादास धनसिंग पाटील यांच्याबाबत विविध तक्रारी होत्या. यावल तहसीलदारांना दुकानदार पाटील यांना नोटीस बजावून खुलासा घेऊन अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. खुलाशात दुकानदाराने मी आत्महत्येची धमकी दिलेली नाही, नियमित धान्य वाटप करतो, शासनाच्या अटींचे पालन करतो ई पॉस मशिनद्वारे धान्य वाटप करतो असे म्हटले आहे. दुकानदाराने सादर केलेला खुलासा सयुक्तिक नसल्याने वितरणाचे विनियमन आदेश १९७५ मधील तरतुदींचा व प्राधिकारपत्रातील अटी व शर्तीचा भंग केल्याने दुकानदार अंबादास पाटील यांचे दुकान क्रमांक ७९ चे प्राधिकारपत्र रद्द करण्यात आले आहे. दरम्यान, दुकान क्रमांक ७९ हे आता मौजे कोसगाव येथील स्वस्त दुकानदार सुभाष तायडे यांच्या स्वस्त धान्य दूकानास तत्काळ जोडण्याची कार्यवाही करण्यास यावल तहसीलदारांना सूचना देण्यात आल्या आहेत.