लोहारा ता. पाचोरा, प्रतिनिधी | तालुक्यातील लोहारा येथील आरोग्य केंद्राच्या इमारती बांधकामासाठी मंजुरी मिळून अकरा महिने उलटूले. तरीही बांधकामात दिरंगाई होत असल्याने जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला पदाधिकार्यांनी सुरुवात केली आहे.
तालुक्यातील लोहारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या बांधकामासाठी २७ मार्च २०२० रोजी शासकीय मान्यता मिळाली होती. त्यानंतर १४ ऑगस्ट २०२० रोजी तांत्रिक मान्यताही मिळाली. मात्र ११ महिने उलटूनही अद्याप इमारतीच्या बांधकामासाठी सुरूवात करण्यात आलेली नाही. दरम्यान लोहारा हे गाव पाचोरा तालुक्यात असले तरी ते जामनेर मतदारसंघात मोडते. जिल्हा परिषदेतही भाजप चीच सत्ता आहे. तर प्राथमिक आरोग्य केंद्राची मंजुरी मिळविणारे जिल्हा परिषद सदस्य व लोहारा येथील ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात असल्याने केवळ राजकीय द्वेषापोटी इमारतीच्या बांधकामास तांत्रिक मान्यता मिळूनही ११ महिने लोटले गेले. तरीही निविदा धारकास कार्य आरंभ आदेश मिळत नसल्याने जि. प. सदस्य दिपकसिंग राजपुत, रावसाहेब पाटील, लोहारा ता. पाचोरा ग्रामपंचायतीचे सरपंच अक्षयकुमार जैस्वाल, उपसरपंच विमलबाई जाधव यांच्यासह सदस्यांनी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.