जळगाव, प्रतिनिधी । येथील बारावीच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या उज्वल भवितव्यासाठी लॉक डाऊनचे नियम पाळून कोचिंग क्लास हे सुरु करण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
विद्यार्थ्यांच्या आयुष्यात इयत्ता १२ वीचे शैक्षणिक वर्ष हे अत्यंत महत्वाचे असते. इयत्ता १२ वीचा अभ्यास, परीक्षा निकाल यातूनच विद्यार्थ्यांचे पुढील आयुष्य ठरणार आहे. त्यांचे करिअर ठरणार आहे. तरी याविषयीचे गांभीर्य लक्षात घेऊन खाजगी कोचिंग क्लास सुरु करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी पालकांनी केली आहे. लॉक डाऊनच्या दरम्यान ज्या सूचना करण्यात आला आहे त्या सूचनांचे पालन खाजगी कोचिंग क्लास संचालक व विद्यार्थी करतील असे निवेदनाद्वारे आश्वासित करण्यात आले आहे. निवेदनांवर सारिका सोमवंशी, अश्विनी सुर्वे, भरती देशमुख, पूजा पाठक, हेमंत पाटील, बाळासाहेब पाटील, उल्हास सुतार आदी पालकांची स्वाक्षरी आहे.