लिहून घ्या , काँग्रेसच ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी — फडणवीस

 

नागपूर : वृत्तसंस्था ।  ओबीसींच्या रद्द झालेल्या राजकीय आरक्षणावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी काँग्रेसवर  हल्लाबोल केला.  या आरक्षणाचे खरे मारेकरी कोण? हे सांगताना त्यांनी दोन काँग्रेस पदाधिकाऱ्यांची नावं सांगितली.

 

काँग्रेसशासित छत्तीसगड, राजस्थानात ओबीसी आरक्षण सुरु मग महाराष्ट्रातलं आरक्षण का गेलं?, असा सवाल त्यांनी काँग्रेसला केला.

 

आज ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपने राज्यभर आंदोलन पुकारलं आहे. राज्याच्या विविध भागांत आज भाजप नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको, चक्काजाम आणि विविध आंदोलनाद्वारे रोष व्यक्त करत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नागपुरात आंदोलन पार पडले

 

“ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी कोण… तुम्ही सगळ्यांनी लिहून घ्या… ओबीसी आरक्षणाची जी पिटीशन झाली, ज्या पिटीशनमुळे हा निकाल आला, ही पिटिशन दोन जणांनी दाखल केली होती. पहिला व्यक्ती म्हणजे वाशिममधल्या काँग्रेस आमदाराचा मुलगा आणि दुसरा व्यक्ती भंडारा जिल्हा परिषदेचा काँग्रेसचा अध्यक्ष…, असं म्हणत काँग्रेस ओबीसी आरक्षणाचे खरी मारेकरी आहे”, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

 

“ओबीसी आरक्षणाविरोधात ज्यांनी पिटीशन दाखल केली ते दोन्हीही काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत… काँग्रेसच्या कार्यालयामध्ये ज्यांची उठबस आहे, काँग्रेसच्या कार्यालयामध्ये ज्यांना मान सन्मान दिला जातो… त्यांनी ही पिटीशन दाखल केली आहे…”

 

हे दोघे जणं पहिल्यांदा नागपूरच्या उच्च न्यायालयात गेले … त्यावेळी आमचं सरकार होतं… त्यावेळी मी चंद्रशेखर बावनकुळे यांना इन्चार्ज केलं…. ग्रामविकास खातं पंकजाताईंकडे होतं… तिकडे राम शिंदे होते….  या सगळ्यांना एकत्रितपणे बसवलं… मी त्यांना सांगितलं हे मोठं सगळं षडयंत्र आहे, जे आपल्याला हाणून पाडलं पाहिजे… मी बावनकुळेंचं अभिनंदन करेल, सरकारच्या वतीने ही केस चंद्रशेखर बावनकुळे लढले आणि नागपूरमध्ये उच्च न्यायालयाने आपल्या सरकारच्या बाजूने निर्णय दिला…”

 

“न्यायालयाने त्यावेळी सांगितलं ओबीसींचं आरक्षण रद्द होऊ शकत नाही…. पन्नास टक्क्यांच्यावरती जरी आरक्षण असेल तरीही रद्द होऊ शकत नाही… मग हेच लोक पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेले… सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर 50 टक्क्यांच्यावरती असलेल्या आरक्षणासाठी धोका तयार झाला”, असं फडणवीस म्हणाले.

 

Protected Content