लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवू न देण्याच्या बातम्या खोट्या

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । प्रजासत्ताकदिनी शेतकरी संघटना लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवू देणार नाहीत , राजपथावर रणगाड्यांसोबत ट्रॅक्टरची रॅली काढणार असल्याच्या बातम्या खोट्या असून शेतकरी आंदलनाला बदनाम करण्याचा हा कट आहे, असा आरोप किसान शेतकरी समितीने केला आहे.

समितीचे समन्वयक मंदीप नाथवान म्हणाले, “काही लोक कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाला हिंसक बनवण्यासाठी अशा प्रकारच्या खोट्या अफवा पसरवत आहेत. अशा अफवा शेतकऱ्यांच्या संघर्षाला कमजोर करतात. ही लढाई केंद्र आणि शेतकरीविरोधी धोरणांविरोधात असून दिल्लीच्याविरोधात नाही.”

किसान संघर्ष समितीचे समन्वयक म्हणाले, “लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावणे आणि रणगाड्यांसह ट्रॅक्टर मार्चच्या बातम्या या आंदोलनाला कमजोर करतात, अशा प्रकारचं कोणतंही विधान हे शेतकऱ्यांच्या हिताचं नाही. संयुक्त किसान मोर्चाने अशा प्रकारच्या कुठल्याही कार्यक्रमाच्या आयोजनाला मंजुरी दिलेली नाही.”

पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेशसहित देशातील अनेक राज्यांतील शेतकरी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांचा विरोध करत आहेत. आपल्या मागण्यांसाठी हे शेतकरी गेल्या दीड महिन्यापेक्षा अधिक काळापासून दिल्लीच्या सीमेवर एकत्र आले आहेत. केंद्र सरकारसोबत अनेकदा चर्चा होऊनही शेतकरी आणि सरकारमध्ये सहमती होऊ शकलेली नाही.

Protected Content