जळगाव, प्रतिनिधी । कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. परंतू जळगाव कृषि उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला मार्केटमध्ये आज सकाळी नागरीकांनी प्रचंड गर्दी केल्याचे लाइव्ह कव्हरेज ‘लाईव्ह ट्रेन्डस् न्यूज’ने प्रसारित केले होते. या लाईव्ह वृत्ताची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी बाजार समितीतील भाजीपाला व्यापाऱ्यांची आज दुपारी तातडीने बैठक घेत सक्त सूचना केल्या.
यावेळी या बैठकीत भाजीपाला खरेदीसाठी सकाळच्यावेळी नागरीकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी लॉकडाऊन कालावधीत बाजार समितीतून नागरीकांना किरकोळ भाजीपाला मिळणार नसल्याने त्यांनी बाजार समितीत जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे. जळगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीतील व्यापाऱ्यांची बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते. या बैठकीस बाजार समितीचे सभापती कैलास बोरसे, सहाय्यक पोलीस अधिक्षक नीलभ रोहण, महानगरपालिका आयुक्त सुशील कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक सचिन गोरे, पोलीस उप अधिक्षक दिलीप पाटील, उपनिबंधक सहकारी संस्था मेघराज राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांचेसह व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी टाळण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. असे असूनही जळगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत सकाळच्यावेळी नागरीक किरकोळ भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा उद्देश सफल होण्यात अडचणी निर्माण होत आहे. नागरीकांना जीवनाश्यक वस्तु, भाजीपाला, फळे त्यांचा परिसरातच उपलब्ध होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. असे असूनही जे नागरीक बाजार समितीत किरकोळ खरेदीसाठी जातील. त्यांची वाहने अडविण्यात येईल. तसेच त्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल असेही जिल्हाधिकारी यांनी बैठकीत सांगितले. त्याचबरोबर बाजार समितीती अधिकृत हमाल कामावर आले पाहिजे यासाठी बाजार समितीने पाठपुरावा करावा. तसेच त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था बाजार समितीने करावी. बाजार समितीत दुचाकी वाहने येणार नाही याची काळजी घ्यावी. महानगरपालिका क्षेत्रात भाजीपाला व फळविक्रेत्यांनी त्यांना नेमूण दिलेल्या वॉर्डात विक्री करावी.
दुपारी 12 ते 5 यावेळेतच माल उतरविण्याचा व्यापारी असोसिएशनचा निर्णय
शहरातील दाणा बाजार परिसरात नागरीकांची होणारी गर्दी लक्षात घेता यावर उपाय म्हणून दाणा बाजारातील घाऊक व्यापाऱ्यांची वाहने दुपारी 12 ते 5 यावेळेतच आपला माल उतरवतील असा महत्वपूर्ण निर्णस आज व्यापारी असोसिएशनने घेतला आहे. दाणा बाजारात होणारी गर्दी कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी व्यापाऱ्यांना आवाहन केले असता व्यापारी असोसिएशनने निर्णय घेतला. त्याचबरोबर घाऊक व्यापाऱ्यांनी नागरीकांना माल न विकता तो किरकोळ व्यापाऱ्यांना विकावा. तसेच किरकोळ व घाऊक विक्रीच्या दुकानांची वेळ वेगवेगळी असावी आदि विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. तसेच घाऊक व्यापाऱ्यांकडून माल घेण्यासाठी येणाऱ्या रिक्षा रस्त्यावर उभ्या राहणार नाहीत. दाणा बाजारात अनावश्यक गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याचे आश्वासनही व्यापाऱ्यांनी या बैठकीत दिले. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी यांनी कृषि उत्पन्न बाजार समितीस भेट देवून तेथील परिस्थितीची पाहणी केली. तसेच होणारी गर्दी टाळण्यासाठी बाजार समिती प्रशासनास सुचना केल्यात. यावेळी त्यांच्या समवेत सहायक पोलीस अधिक्षक नीलभ रोहण, महापालिका आयुक्त सुशील कुलकर्णी आदि उपस्थित होते.
नागरीकांनी गर्दी टाळण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच आहे. अशा परिस्थितीत प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करीत आहे. परंतु नागरीकांनीही काळजी घेणे आवश्यक आहे. अशा बिकट परिस्थितीत नागरीकांनी संयम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. अनावश्यक वस्तुंची खरेदी टाळली पाहिजे. विनाकारण प्रवास करु नये. जेणेकरुन कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात आपण यशस्वी होवू. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जळगाव जिल्हावासियांना केले आहे.