यावल, प्रतिनिधी | आयुष्यात लहान लहान ध्येय निश्चित करा, त्यामुळे मोठ्या ध्येयाकडे वाटचाल करणे सोपे जाते. समोरच्या व्यक्तीवर पडणारा तुमचा प्रभाव म्हणजे व्यक्तिमत्व. स्वतःचा शोध घ्या. आवडणारी गोष्ट जमायला हवी. जमणारी गोष्ट आवडायला हवी. तुम्हाला अवगत असलेल्या कौशल्याचा विकास करा असे प्रतिपादन प्रा. डॉ. सोपान बोराटे यांनी केले. ते कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग व समुपदेशन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेच्या’ उद्घाटनप्रसंगी बोलत होते. तसेच ‘व्यक्तिमत्त्व विकासाच्या पायऱ्या’ या विषयावर मार्गदर्शन करून मानसशास्त्रीय व्यक्तिमत्व चाचणी घेतली.
व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील होते.डॉ. सुधा खराटे यांनी ‘विचार बदला, आयुष्य बदलेल’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी विचार व्यक्त केले की, शुद्ध विचाराला येणारी फळे रसाळ गोमटी असतात.एका छोट्या बिजामध्ये वटवृक्ष होण्याचे सामर्थ्य असते. तेच सामर्थ्य एका विचारात असते. सकारात्मक विचार करून आयुष्यात सुंदरता आणा. उपप्राचार्य प्रा.एम.डी. खैरनार यांनी ‘मनावरील नियंत्रण’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, तुमच्या आयुष्यात जे काही चांगलं वाईट घडतं, ते तुमच्या मनामुळे. त्यामुळे मनावरील नियंत्रण खूप महत्त्वाचे असते. मनाला चांगल्या गोष्टी द्या. समारोपप्रसंगी प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी सांगितले की, व्यक्तिमत्त्व विकास हा स्वतः करायचा असतो. वाचनाची सवय लावा. त्यातून खूप माहिती मिळते; ज्ञान वाढते. रुळलेल्या वाटेवरून जाण्यापेक्षा स्वतंत्र वाट तयार करा. आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढायला शिका. या कार्यशाळेत ५५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
प्रास्ताविक प्रा.व्ही. बी. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुधीर कापडे व आभार प्रा.राजू पावरा यांनी मानले. कार्यशाळेस प्रा. ए. एस. अहिरराव, प्रा. विकास उंबरकर, प्रा. नजमा तडवी, प्रा. कलिमा तडवी, प्रा. राजु तडवी उपस्थित होते. कार्यशाळा यशस्वीतेसाठी प्रकाश जाधव, शत्रुघ्न कोळी, कमलेश डांबरे, समाधान धिवर यांनी कामकाज पहिले.