पुणे, वृत्तसेवा । कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मोठ्या प्रामाणावर लशींचे उत्पादन केले तरी देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत लस पोहोचविण्यासाठी चार ते पाच वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे, असा दावा सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी केला.
केंद्रीय औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) सुरक्षिततेच्या कारणास्तव सीरममध्ये लशीची निर्मितीची प्रक्रिया सुरू असतांना त्या चाचण्या थांबविण्याची सूचना केली. त्यामुळे सीरमने सध्या चाचण्या थांबविण्यात आल्या आहेत. त्यांना डीसीजीआयच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. पूनावाला यांनी लसीच्या उपलब्धतेबाबत एका वृत्तसंस्थेकडे अंदाज वर्तविला असून, संपूर्ण देशातील प्रत्येक व्यक्तीला लस देण्यासाठी चार वर्षे लागतील, असे त्यांनी म्हटले आहे. औषध उत्पादक कंपन्या सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात लसीचे उत्पादन वाढवू शकत नाहीत. त्यामुळे अखेरच्या व्यक्तीला लस मिळविण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. गोवर लसीकरणाच्या मोहिमेच्या धर्तीवर दोनदा
करोना प्रतिबंधक लस देण्याचा विचार केला, तर जगाला १५ अब्ज डोसची गरज भासेल, असा अंदाज पूनावाला यांनी व्यक्त केला. भारतासाठी सद्यस्थितीत ४० कोटींपेक्षा अधिक डोसचे नियोजन करू शकत नाही, असे ते म्हणाले.