नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशातल्या लसीकरण मोहिमेबद्दल भाष्य करत राहुल गांधींनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण व्हायला हवं पण ते होत नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “ लसीकरण जोपर्यंत मोठ्या प्रमाणावर होत नाही तोपर्यंत आपला देश सुरक्षित नाही. पण खंत हीच आहे की केंद्र सरकार त्याचा केवळ पीआर इव्हेंट करत आहे”.
आपत्तीमध्ये केंद्राच्या हाताळणीतील कथित गैरव्यवस्थापनाचा आढावा घेणारी ‘श्वेतपत्रिका’ मंगळवारी काँग्रेसने प्रकाशित केली. ‘हा अहवाल फक्त केंद्राकडे बोट दाखवण्यासाठी नसून चुकांची पुनरावृत्ती टाळण्याचा मार्ग ठरू शकेल. केंद्र सरकारने दक्षता घेतली असती तर दुसऱ्या लाटेतील ९० टक्के रुग्णांचे प्राण वाचवता आले असते. विषाणू उत्परिवर्तित होत असून तिसऱ्या लाटेसाठी तरी केंद्राने पूर्वतयारी केली पाहिजे,’’ असे आवाहन काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केले.
फक्त भारतात खासगी रुग्णालयांत लशींसाठी पैसे मोजावे लागतात, जगात सर्वत्र लस मोफत दिली जाते, असे सांगत राहुल यांनी लसीकरण धोरणावर आक्षेप घेतला. सोमवारी एका दिवसात ८० लाखांहून अधिक लसमात्रा दिल्या गेल्या. या संदर्भात, एकदिवस चांगले काम झाले (लसीकरणाची जास्त संख्या), पण लसीकरण ही प्रक्रिया असून मोहीम म्हणून राबवली पाहिजे. लशींबाबत शंका असतील तर केंद्राने जनजागृती करून शंभर टक्के लसीकरण करावे. काँग्रेसने कोणत्याही लशीबद्दल शंका घेतलेली नाही. केंद्राने सुरक्षित व विश्वासार्ह लशी अधिकाधिक प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.