टोक्यो : वृत्तसंस्था । बॉक्सर लव्हलिना तिन्ही फेऱ्यांमध्ये ०-५ ने पराभूत झाली. या पराभवामुळे लव्हलिनाला कांस्य पदकावरच समाधान मानावं लागलं आहे
ऑलिम्पिकमध्ये पदकनिश्चिती केलेल्या भारताची बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहाइन हिच्याकडून भारतीयांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, महिलांच्या ६९ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत लव्हलिनाला पराभवाचा सामना करावा लागला. उपांत्य फेरीत लव्हलिनाचा जगज्जेत्या बुसेनाझ सुर्मीनेलीने पराभव केला.
आसामच्या २३ वर्षीय लव्हलिनाने उपउपांत्यपूर्व लढतीत जर्मनीच्या नॅडिन अपेट्झला ३-२ असे नमवले होते. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपईच्या नीन-शेन चेनला ४-१ अशी धूळ चारून तिने पदक पक्के केले होते.
लव्हलिना बोर्गोहेन उपांत्य फेरीच्या सामन्यात टर्कीच्या विश्वविजेत्या बुसेनाझ सुर्मीनेलीकडून पराभूत झाली आहे. सामन्यामध्ये लव्हलिनाने तिन्ही फेऱ्या गमावल्या. त्यामुळे लव्हलिनाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी लव्हलिना तिसरी भारतीय बॉक्सर बनली आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाच्या बॉक्सरसमोर मात्र, लव्हलिनाने चांगली लढत दिली. लव्हलिनाच्या कांस्यपदकासह भारताच्या नावावर टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आता तीन पदके झाली आहेत.
लव्हलिना बोर्गोहाइन उपांत्य फेरीत विश्वविजेत्या टर्कीच्या बुसेनाझ सुर्मीनेली विरुद्ध हरली आहे. लव्हलिनाचा ०-५ ने पराभव झाला. लव्हलिना तिन्ही फेऱ्यांमध्ये ०-५ ने पराभूत झाली. या पराभवामुळे लव्हलिनाचा टोक्यो ऑलिम्पिकमधला प्रवास कांस्यपदकासह समाप्त झाला आहे. लव्हलिनाने सामना गमावला, पण तिने विश्वविजेत्या बुसेनाझ सुर्मेनेलीला कडवे आव्हान दिले होते.
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचे हे तिसरे पदक आहे. यापूर्वी मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य तर पीव्ही सिंधूने बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. लव्हलिनाचे पदक हे गेल्या नऊ वर्षांतील ऑलिम्पिक बॉक्सिंगमधील भारताचे पहिले पदक आहे. यापूर्वी २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये बॉक्सर मेरी कोमने कांस्यपदक पटकावले होते. त्याचबरोबर पुरुषांच्या बॉक्सिंगमध्ये विजेंदर सिंगने २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले.