लवकरच राज्यातील २० मंत्री जेलमध्ये !; आता बारामतीला जाणार : सोमय्या

ठाणे | महाविकास आघाडी सरकारमधील २० मंत्री जेलमध्ये जाणार असून आता आपण पुढील आठवड्यात बारामतीच्या दौर्‍यावर जाणार असल्याची घोषणा भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. ते आज येथे भाजपच्या कार्यक्रमात बोलत होते.

 

किरीट सोमय्या आज पाचपाखाडी येथील केबीपी कॉलेजमध्ये आले होते. यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ठाकरे सरकारमध्ये ११ भ्रष्टाचारी नेते असल्याचे मी आधी सांगितले होते. मात्र आता ११ ऐवजी २० मंत्र्यांची नावे लवकरच पुढे येणार आहेत. मला अनेक ठिकाणाहून फोन येत असतात. उद्या कोण टार्गेट आहे असं विचारलं जात असतं. कोणाचा भ्रष्टाचार बाहेर येणार असं विचारण्यात येतं, असं त्यांनी सांगितलं.

 

सोमय्या पुढे म्हणाले की, आघाडी सरकारमधील माजी मंत्री अनिल देशमुख कुठे आहेत? परमबीर सिंग कुठे आहे? एकाला वर्षावर लपवलंय तर दुसर्‍याला मातोश्रीत लपवलं आहे, असा आरोपही त्यांनी केला. अनिल देशमुख जेव्हा तुरुंगात जातील तेव्हा सर्वांची झोप उडेल. जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक आणि अनिल परबही तुरुंगात जातील असा दावा त्यांनी केला. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. म्हाडामध्ये वाझे प्रकरण सुरू झाले आहे, असंही ते म्हणाले.

 

यावेळी सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही टीका केली. उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांचे संबंध होते. त्याबाबतचे सातबाराचे उतारे समोर ठेवले होते, असं त्यांनी सांगितलं. अनिल परब यांचा रिसॉर्ट बेकायदेशीर होता. तो तोडायचे आदेश ठाकरे सरकारने दिले आहेत. आम्ही कोणाच्या धमकीला घाबरत नाही. आम्ही आमचे काम करतच राहणार. प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डन इमारतींच्या ५ मजले अनधिकृत आहेत. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ते पाडण्याचे आदेश दिले आहेत, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, आपण कोल्हापूरला जाऊन आलो आहे. अंबाबाईचा आशीर्वाद घेतला आहे. आता मी बुधवारी बारामतील जात असल्याची घोषणा सोमय्या यांनी केली.

Protected Content