मुंबई: वृत्तसंस्था ।मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला कंगना राणावतनं प्रत्युत्तर दिलं. ‘महाराष्ट्र मालकीचा असल्यासारखे वागू नका. तुम्ही केवळ जनतेचे सेवक आहात. तुमच्या आधीही या पदावर कोणीतरी होतं आणि लवकरच दुसरा कोणीतरी येईल,’ असा इशारा कंगनानं मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
सुशांतसिंह राजपूत प्रकरणात मुंबई, मुंबई पोलीस व आदित्य ठाकरे यांच्यावर कंगना राणावत सातत्यानं आरोप करत होती. मुख्यमंत्री ठाकरे यांना एकेरी भाषेत बोलण्यापर्यंत तिची मजल गेली होती. केंद्रातील भाजप सरकारनं तिला ‘वाय’ दर्जाची सुरक्षा दिल्यामुळं या प्रकरणाला राजकीय वळण लागलं होतं. उद्धव ठाकरे यांनी या घडामोडींवर मौन बाळगलं होतं. मुख्यमंत्रिपदाचा मास्क बाजूला ठेवून एक दिवस बोलेन, असं ते म्हणाले होते. दसरा मेळाव्यात अपेक्षेप्रमाणे त्यांनी शिवसेनेच्या टीकाकारांवर टीकेचे आसूड ओढले. कंगनाचं नाव न घेता त्यांनी त्याला ‘नमक हराम’ म्हणून हिणवले होते. स्वत:च्या राज्यात खायला मिळत नाही म्हणून हे मुंबईत येतात आणि इथे नमकहरामी करतात, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. या टीकेला कंगनानं उत्तर दिलं.
‘उद्धव ठाकरे हे देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्याप्रमाणे हिमालयाचं सौंदर्य प्रत्येक भारतीयाचं आहे, त्याचप्रमाणे मुंबई सर्वांची आहे. ही दोन्ही माझी घरं आहेत. लोकशाहीने दिलेले हे अधिकार उद्धव ठाकरे माझ्याकडून हिसकावून घेऊ शकत नाहीत. तुमची टुकार भाषणं तुमच्या अकार्यक्षमतेचा पुरावा आहेत,’ अशी टीकाही तिनं केली आहे.
‘तुमच्याप्रमाणे मी घराणेशाहीचं अपत्य नाही. मी माझ्या वडिलांच्या संपत्तीवर कधी नशा केली नाही. तसं असतं तर हिमाचलमध्येच राहिले असते. मी एका चांगल्या घरातून आलेय. पण मला त्यांच्या संपत्तीवर व नावावर जगायचं नव्हतं. कारण, काही लोकांना आत्मसन्मान असतो,’ असा टोला कंगनानं मुख्यमंत्र्यांना हाणला आहे.
‘संजय राऊत मला हरामखोर म्हणाले आणि उद्धव ठाकरे ‘नमक हराम’ म्हणत आहेत. मुंबईनं आश्रय दिला नसता तर मला खायला मिळालं नसतं असं ते म्हणतात. मी तुमच्या मुलाच्या वयाची आहे. स्वत:च्या हिंमतीवर मोठ्या झालेल्या महिलेबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांना काहीतरी वाटलं पाहिजे,’ असंही तिनं म्हटलं आहे.