जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील लमांजन येथील ६८ वर्षीय वृध्द महिलेचा गिरणा नदीच्या पात्रात पाय घसरल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी १ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह नेण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, लमांजन येथील हिराबाई पाटील (वय-६८) या प्रांतविधीसाठी सकाळी ५ वाजता गिरणा नदीच्या काठावर गेल्या होत्या. नदीतील पाण्याचा अंदाज न असल्याने त्यांचा पाय घसरून त्या नदीत पडल्या असाव्यात असा सांगण्यात येत आहे. सकाळी ७ वाजेपर्यंत हिराबाई पाटील ह्या घरी न आल्याने त्यांचा पुतण्या गोरख पाटील शोधण्यासाठी गिरणा नदीच्या काठावर आला. त्यावेळी त्यांना एका ठिकाणी बादली आणि चष्मा आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. २ तास शोधाशोध केल्यानंतर त्यांचा मृतदेह काटेर झुडूपात आढळून आला.
याबाबत एमआयडीसी पोलीसांना माहिती देण्यात आली. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात १ मुलगा, सून , नातेवंडे, पुतणे असा परिवार आहे.