जळगाव प्रतिनिधी। लग्न खरेदीच्या निमित्ताने जळगावात आलेला तरुण अपघातात ठार झाल्याची दु:खद घटना आज दुपारी किनोद-फूफनी गावादरम्यान घडली. मयत तरुणाचा मागील महिन्यातच साखरपुडा झाला होता. तर 2 मार्च रोजी त्याचे लग्न होणार होते.
याबाबत माहिती अशी की, भूषण विठ्ठल सोनवणे (वय 23) आणि रवींद्र भगवान सोनवणे (वय 27 दोन्ही रा. देवगाव ता. जळगाव) हे दोघे जण जळगाव येथे रेशन धान्याच्या कामानिमित्त आले होते. जळगावातील काम संपल्यानंतर दोघे जण आपली दुचाकी (क्र. एम एच 19, 0657) घरी जात होते. दुपारी चार वाजेच्या सुमारास किनोद-फूफनी गावात दरम्यान समोरून येणाऱ्या अज्ञात दुचाकीने जोरदार धडक दिली. यात भूषण सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला. तर रवींद्र सोनवणे गंभीररित्या जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन भूषणचा मृतदेह जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. तर जखमी झालेला रवींद्र सोनवणेला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
पुढील महिन्यात होते भूषणचे लग्न
मयत झालेल्या भूषण सोनवणेचे मागील महिन्यात साखरपुडा झाला होता. तर 2 मार्च रोजी लग्न होणार होते. त्यानिमित्ताने रेशन धान्याच्या कामासाठी भूषण जळगावला आला होता. भूषणच मृतदेह बघताच नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. मयताच्या पश्चात आई कलाबाई, शरद आणि योगेश दोन भाऊ आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.