नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशभरात लँडलाईन फोनवरून एखाद्या मोबाईलवर फोन करण्यासाठी ग्राहकांना मोबाईल क्रमांकाच्या अगोदर ‘शून्य’ (0) हा अंक लावणं अनिवार्य असेल. दूरसंचार विभागानं यासंबंधी टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाचा प्रस्ताव स्वीकारला आहे.
या पद्धतीच्या कॉलसाठी २९ मे २०२० रोजी मोबाईल क्रमांकापूर्वी शून्य लावण्याची शिफारस ट्रायकडून करण्यात आली होती. यामुळे, दूरसंचार सेवाप्रदान करणाऱ्या कंपन्यांना अधिक नंबर बनवण्याची सुविधा उपलब्ध होऊ शकेल.
दूरसंचार विभागानं २० नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या एका सर्क्युलरमध्ये केलेल्या उल्लेखानुसार, लँडलाईनवरून मोबाईलवर क्रमांक डाईल करण्याच्या पद्धतीत बदलांची ट्रायची शिफारस स्वीकार करण्यात आली आहे. यामुळे मोबाईल तसंच लँडलाईन सेवांसाठी अधिकाधिक क्रमांक बनवण्याची सुविधा मिळू शकेल.
दूरसंचार विभागाच्या म्हणण्यानुसार, दूरसंचार कंपनन्यांना लँडलाईनच्या सर्व ग्राहकांना शून्य डायल करण्याची सुविधा द्यावी लागेल. ही सुविधा आपल्या क्षेत्रातून बाहेर कॉल करण्यासाठी उपलब्ध आहे.
दूरसंचार कंपन्यांना ही नवी व्यवस्था सुरू करण्यासाठी १ जानेवारीपर्यंत वेळ देण्यात आलीय. डायल करण्याच्या पद्धतीतील या बदलामुळे दूरसंचार कंपन्यांना मोबाईल सेवांसाठी २५४.४ कोटी अतिरिक्त क्रमांक सृजित करण्याची सुविधा मिळू शकेल. भविष्यातील गरज पूर्ण करण्यासाठी ही सुविधा फायदेशीर ठरेल