मुंबई : वृत्तसंस्था | “लसीकरणाबाबत केले जात असलेले आरोप चुकीचे असून राज्यातील मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी राजकारण करायचं बंद करावं, लोकांच्या जिवाशी खेळू नये”, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे
महाराष्ट्रात ३ दिवसांसाठी पुरेल इतकाच लसींचा साठा शिल्लक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील मुंबईत ३ दिवसांचाच लसींचा साठा शिल्लक असून केंद्र सरकार महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप केला. त्यावरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला सुनावले आहे.
. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या दाव्यानंतर राज्यातल्या लसीकरण कार्यक्रमाचं काय होणार? यावर चर्चा सुरू झाली होती. लसींचा पुरवठा कमी पडल्यास राज्यातील लसीकरणामध्ये खंड पडेल की काय? अशी देखील शंका उपस्थित केली जाऊ लागली होती. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी उलट राज्य सरकारवरच निशाणा साधला आहे.
“लसीकरणाबाबतचा आरोप चुकीचा आहे. मुळातच आपली लसीकरणाची क्षमता आणि टार्गेट ग्रुपला आवश्यक लसींचा पुरवठा आपल्याकडे नियमितपणे होत असतो. लसींचा देशभरात पुरवठा होत आहे. देशात सर्वात जास्त लसी महाराष्ट्राला मिळालेल्या आहेत. तीन दिवस पुरेल एवढा साठा संपायच्या आत पुढचा साठा येतो. रोज साठा येत असतो. आपल्याला काही लसींची साठेबाजी करायची नाहीये”, असं फडणवीस म्हणाले आहेत.
यावेळी फडणवीसांनी राज्य सरकारनं या मुद्द्यावर करत असलेलं राजकारण बंद करावं, अशा शब्दांत टीका केली आहे. “भारत सरकार काही वेगळं नाहीये. या सगळ्या गोष्टी मीडियात बोलण्याऐवजी भारत सरकारशी चर्चा करून का करता येत नाहीत. आपलं कुणी जाऊन दिल्लीत किंवा पुरवठादारांकडे जाऊन का बसत नाही. फक्त मीडियात बोलायचं आणि हात झटकायचे हे बंद व्हायला हवं. गांभीर्य यायला हवं. प्रत्येक वेळी विरोधकांना म्हणायचं राजकारण करू नका आणि मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी राजकारण करायचं हे बंद करा. लोकांच्या जिवाशी खेळू नका”, असं फडणवीस म्हणाले आहेत.