जेरुसलेम : वृत्तसंस्था । इस्त्राईलने १६२८ रॉकेटचे इमोजी असलेल्या ट्विटची मालिकाच टाकली आहे. इस्त्रायली नागरिकांवर डागण्यात आलेल्या रॉकेटची ही एकूण किंमत आहे. यापैकी प्रत्येक रॉकेट मारण्यासाठीच आहे असे आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.
इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यात तणाव वाढत असताना, हमास रॉकेट हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्राईलच्या सैन्याने गाझा शहराच्या अनेक ठिकाणी जोरदार हवाई हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत दोन्ही बाजूच्या २०० जणांचा मृत्यू झाला आहे.
सध्या सुरू असलेल्या युद्धसदृश्य परिस्थितीमध्ये अनेक सामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न चालू असले तरी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी रविवारी हल्ले सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यानंतर हे हवाई हल्ले सुरूच आहेत.
या इमोजीसच्या ट्विटनंतर या अकाऊंटवरुन आणखी एक ट्विट करण्यात आलं आहे. “तुम्हा सगळ्यांना फक्त काही दृष्टीकोन देण्यासाठी, इस्त्रायली नागरिकांवर डागण्यात आलेल्या रॉकेटची ही एकूण किंमत आहे. यापैकी प्रत्येक रॉकेट मारण्यासाठीच आहे,” असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.
“चुक करू नका. प्रत्येक रॉकेटचा एक पत्ता असतो. जर तो पत्ता तुमचाच असेल तर तुम्ही काय कराल? ” असा इशाराही इस्त्रायलने त्यानंतरच्या ट्विटमध्ये दिला आहे.
या ट्विटनंतर पॅलेस्टाईनमधल्या नागरिकांसह अनेकांनी यावर टीका केली आहे. इस्त्राईलने या युद्धात आघाडी गमावली आहे. ते आता इमोजिसवर युद्ध लढत आहेत. हे दयनीय आहे असे एका युजरने म्हटले आहे.
इस्रायल आणि हमास अतिरेकी गटातील आठवड्याभराच्या संघर्षातील सर्वात मोठ्या हल्ल्यानंतर ही ट्विटची मालिका समोर आली आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हवाई हल्ल्यामध्ये आठवड्यात कमीतकमी २१२ पॅलेस्टनी नागरिक मरण पावले आहेत. यामध्ये ६१ मुले आणि ३६ महिलांचा समावेश आहे. १,४०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
दरम्यान, हमासने आतापर्यंत देशाच्या नागरी भागांमध्ये ३,००० हून अधिक रॉकेट डागले आहेत असे इस्राईलने सांगितले. त्यापैकी बरेच रॉकेट ही आयर्न डोममुळे नष्ट करण्यात आली. इस्राईलवर करण्यात रॉकेट हल्ल्यात ५ वर्षाचा मुलगा आणि एका सैनिकासह दहा जण ठार झाले आहेत.
गाझा पट्टय़ात सोमवारी सकाळी मोठय़ा प्रमाणात हवाई हल्ले करून हमास दहशतवाद्यांचे पंधरा किलोमीटरचे बोगदे उद्ध्वस्त केले असून अनेक हमास कमांडर्सची घरे जमीनदोस्त केली आहेत, असा दावा इस्रायली लष्कराने केला आहे.