मुंबई प्रतिनिधी । रेल्वे कर्मचार्यांना आता फलाटावर वावरण्यासाठी हॉवरबोर्ड हे वाहन मिळणार असून या माध्यमातून त्यांची कार्यक्षमता वाढणार आहे.
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड करून रेल्वे फलाटावर आता कर्मचार्यांना हॉवरबोर्ड हे वाहन मिळणार असल्याची माहिती दिली आहे. हे दोन चाकी वाहन असून याच्या मदतीने फलाटावर अगदी सहजपणे एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाता येणार आहे. रेल्वे कर्मचार्यांना फलाटावर मोठ्या प्रमाणात फिरावे लागते. त्यांच्यासाठी हे वाहन वरदान सिध्द होणार आहे. विशेष करून रेल्वे वाहक अथवा गार्डला तातडीने एखादे डॉक्युमेंट द्यावयाचे असल्यास याचा चांगला उपयोग होणार आहे. साधारणपणे १८ डब्यांच्या एक्सप्रेस गाडीत इंजिनापासून ते शेवटच्या डब्यापर्यंत जावयाचे असल्यास धावपळ करूनदेखील तीन मिनिटे लागतात. मात्र या वाहनामुळे हेच अंतर अवघ्या ४२ सेकंदामध्ये कापता येणार आहे. अर्थात, यामुळे फलाटावर काम करणार्या रेल्वे कर्मचार्यांच्या कार्यक्षमतेतही वाढ होणार असल्याचे पियुष गोयल यांनी स्पष्ट केले आहे.
रेल्वे प्रशासनाने नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शताब्दी एक्सप्रेससाठी या प्रकारच्या हॉवरबोर्डचा वापर सुरू केला आहे. तर आता याची मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरही यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. यामुळे हा पथदर्शी प्रकल्प लवकरच देशभरातल्या अन्य रेल्वे स्थानकांवर सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई सेंट्रल स्टेशन पर प्लेटफॉर्म सर्फिंग का सफल परीक्षण किया गया, यह भीड़ वाले प्लेटफॉर्म पर भी तेज गति से एक स्थान से दूसरे स्थान पर पहुंचना सुनिश्चित करेगा, तथा इसके उपयोग से रेलवे पुलिस बहुत कम समय में यात्रियों तक पहुंच सकेगी pic.twitter.com/dTocotgOSp
— Piyush Goyal (@PiyushGoyal) January 12, 2019