चाळीसगाव, प्रतिनिधी | येथील रेल्वे लाईन ओलांडत असताना अचानक रेल्वेच्या जोरदार धडकेत अनोळखी तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहरातील रेल्वे स्थानकावरील किमी नं. ३२७/१ ते ३२७/९ च्या दरम्यान रेल्वे लाईन ओलांडत असताना अचानक डाऊन राजधानी एक्सप्रेस (गाडी क्र. २२२२१) च्या धडकेत अनोळखी तरूणाचा (वय- ३० ते ३५ अंदाजे) जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना १८ डिसेंबर रोजी ८:१५ वाजताच्या पूर्वी उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान घटना घडताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाला शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान मृताची ओळख अद्याप पटलेली नसून मयताच्या उजव्या हातावर ” सचिन’ नाव असे गोंदलेले आहे. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरेश महाजन हे करीत आहेत.