नवी दिल्ली वृत्तसंस्था । अनलॉक-४ मध्ये रेल्वेने आणखी काही गाड्या सुरू केल्याबरोबर तिकिटाचा काळाबाजार करणारेही सक्रिय झाले आहेत. असे असले तरी त्यांच्यासाठी हा काळाबाजार सोपा राहिलेला नाही. रेल्वे संरक्षण दलाने कन्फर्म तिकीट बुकिंगसाठी वापरण्यात आलेले ‘रियल मँगो’ हे अवैध सॉफ्टवेअर बंद केले असून तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्या एकूण ५० दलालांना अटक केली आहे.
तिकिटांचा हा घोटाळा पश्चिम बंगाल ते आसाम, बिहार आणि गुजरातपर्यंत पसरलेला आहे. या व्यतिरिक्त रेल्वेने सुमारे ५ लाख रुपयांची तिकिटे देखील जप्त केली आहेत.
आरपीएफचे महासंचालक अरुण कुमार यांनी दलालांच्या या काळाबाजाराबाबत संपूर्ण माहिती दिली. एका अवैध सॉफ्टवेअरच्या माध्यमातून एका मोबाइल अॅपद्वारे कॅप्चा, बँक ओटीपीला बायपास केले जात होते. त्यानंतर तिकीट बुक केले जात होते, अशी माहिती अरुण कुमार यांनी दिली. हे सॉफ्टवेअर स्वत:च प्रवासी आण पेमेंटचा तपशील फॉर्ममध्ये भरण्याचे काम करत होते. दलाल बहुतेक वेळा तत्काळ तिकिट बुकिंगसाठी याचा वापर करत होते, अशी माहितीही अरुण कुमार यांनी दिली.
अरुण कुमार यांनी या घोटाळ्याबाबत माहिती देताना पुढे सांगितले की, सॉफ्टवेअरच्या माध्यमातून IRCTC च्या वेबसाइटवर IRCTC आयडीद्वारे लॉगइन केले जात होते. हे अवैध सॉफ्टवेअर पाच स्तर असलेल्या स्ट्रक्टरद्वारे विकले जात होते. यासाठी बिटकॉइनमध्ये पैसे दिले जात होते. या अवैध सॉफ्टवेअरचे संचलन करणाऱ्या मुख्य आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आलेली आहे. तिकिटांचा हा काळाबाजार कारवाईद्वारे पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे.
हे सॉफ्टवेअर तयार करणाऱ्याने आपल्या या उत्पादनाची जाहिरात यूट्यूबवर दिली होती. या नंतर या द्वारे या टोळीच्या सदस्यांपर्यंत पोलिस पोहोचले. उत्तर-मध्य रेल्वे, पूर्व रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या आरपीएफ युनिटने काही संशयितांना पकडले. त्यानंतर या काळ्याबाजाराचा पर्दाफाश झाला.