नवी दिल्ली (वृत्तसंस्था) द्वेष आणि हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्टवर कडक कारवाई करणाऱ्या फेसबुकने भारतातील सत्ताधारी पक्ष अर्थात भाजपाचे नेते आणि संबंधित काही ग्रुपवर कारवाई करण्यास नकार दिल्याचा गौप्यस्फोट ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने केला आहे.
‘लोकसत्ता’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. या रिपोर्टनुसार भाजपाच्या तेलंगानातील आमदार टी. राजा सिंह यांच्या द्वेष पसरवणाऱ्या पोस्टचा उल्लेख करण्यात आलेला आहे. या पोस्टमध्ये राजा हे अल्पसंख्याकांविरोधात हिंसा करण्याचे आवाहन करत आहेत. फेसबुकमध्ये सध्या कार्यरत असलेल्या आणि माजी कर्मचाऱ्यांनी सांगितले की, अंखी दास यांचा या प्रकरणातील हस्तक्षेप हा कंपनीने सत्ताधारी पक्षाविषयी अनुकूलता दर्शवल्याचा व्यापक स्वरूपाचा भाग आहे. फेसबुकच्या भारतातील पब्लिक पॉलिसी संचालक अंखी दास यांनी कर्मचाऱ्यांना यासंदर्भात सूचना दिल्या. भाजपा नेत्यांवर हिंसाचार पसरवणाऱ्या पोस्टवरून कारवाई केल्यास कंपनीच्या भारतातील व्यावसायिक वाढीला धोका निर्माण होऊ शकतो, असे दास यांनी कर्मचाऱ्यांना सांगितल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. फेसबुकच्या भारतातील वरिष्ठ कार्यकारिणीनं सत्ताधारी भाजपाशी संबंधित चार नेते आणि ग्रुप यांच्यावर द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट संदर्भात असलेले नियम लागू करण्यास विरोध केला आहे. दुसरीकडे वस्तुस्थिती अशी आहे की, काही नेते आणि ग्रुप हिंसा भडकावण्यात आणि चिथावणी देण्यात सहभागी होते.