नवी दिल्ली : वृत्तसंस्था । ‘राहुल गांधी यांना इतका हाय क्वॉलिटी नशा कुठून मिळतो?’ असं विधान करणारे भाजप नेते आणि मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा चर्चेत आलेत.
राहुल गांधी यांनी कृषी कायदा आणि भारत चीन तणावाववर केंद्रातील मोदी सरकारला टीकेच्या धारेवर धरलंय. त्यावरून नरोत्तम मिश्रा राहुल गांधींवर टीका करत होते.
‘१० दिवसांत कर्जमाफी, चीनला १५ मिनिटांत बाहेर करणं. ज्यांनी राहुल गांधींना हे शिकवलंय त्यांना मी सॅल्युट करतो… राहुल गांधींना इतका हाय क्वॉलिटी नशा मिळतो तरी कुठून?’ असं म्हणत मिश्रा यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
‘आपली एक हजार २०० चौरस किलोमीटर जमीन हडप केली गेली. आमचं सरकार असतं तर १५ मिनिटांत चीनच्या सैन्याला बाहेर फेकलं असतं. चीनला १०० किलोमीटर मागे ढकललं असतं’ असं म्हणत ‘खेती बचाओ’ यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून पंतप्रधानांना लक्ष्य केलं होतं. ‘आमचं सरकार होतं तेव्हा आपल्या देशात पाऊल टाकण्याचीही चीनची हिंमत नव्हती. संपूर्ण जगात आज एकच देश आहे, जिथे दुसऱ्या देशाचे सैनिक घुसले आहेत आणि भ्याड पंतप्रधान म्हणतात की आपल्या देशाच्या एक इंच जमिनीवरही कुणी कब्जा केलेला नाही.
भारताच्या सीमेवर घुसखोरी करण्याची हिंमत चीनमध्ये कुठून आली? नरेंद्र मोदींनी देश कमकुवत केल्याचं चीनला माहित आहे. कोरोनाच्या वेळी भारताचे पंतप्रधान अपयशी ठरले. देशातील शेतकरी आणि मजूर दुबळे झाले आहेत’ असं म्हणत राहुल गांधींनी मोदींवर हल्लाबोल केला होता.
नव्या कृषी कायद्यांवरून राहुल यांनी सरकारला लक्ष्य केलं होतं. ‘सातत्याने शेतकरी आणि मजुरांना कमकुवत करण्याचं काम सरकारच्या नवीन कायद्यांनी केलंय. या जाचक कायद्यांविरोधात लढण्याचं काम आम्ही सुरूच ठेवणार आहोत. काँग्रेस सत्तेत होती तेव्हा शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होत नव्हता’ अशी वक्तव्यंही राहुल गांधी यांनी सभेदरम्यान केली होती.