नवी दिल्ली : वृत्तसंस्था । राहुल गांधी यांच्या आरोपांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं आहे.दिल्लीमधील काही लोक मला लोकशाही शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे.
देशातील लोकशाही संपुष्टात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बोलणाऱ्या प्रत्येकाला दहशतवादी ठरवले जात आहे. दिल्लीच्या वेशीवर आंदोलक शेतकऱ्यांची पंतप्रधानांना काळजी नसून ते अत्यंत अकार्यक्षम आहेत. तीन-चार कुडमुडय़ा भांडवलदारांच्या आधारे मोदी देश चालवत असून त्यांच्यासाठी पसे उभे करण्यात गुंतलेले आहेत, असे गंभीर आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहेत..
केंद्रशासिच प्रदेशातील नागरिकांसाठी आरोग्य विमा संरक्षण देण्यासाठी आयुषमान भारत योजनेची सुरुवात केल्यानंतर ते बोलत होते.
“दिल्लीतील काही लोक मला नेहमी टोमणे मारत अपमान करत असतात. त्यांना मला लोकशाहीचे धडे द्यायचे आहेत. त्यांना मला सांगायचं आहे की जम्मू काश्मीरमधील जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुका लोकशाहीचं उदाहरण आहे,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
“काही राजकीय लोक सारखं लोकशाहीवर लेक्चर देत असतात. पण त्यांचा दुटप्पीपणा आणि खोटारडेपणा तर पहा की सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतरही पाँडिचेरीमध्ये स्थानिक निवडणूक झालेली नाही. तर दुसरीकडे जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर एका वर्षाच्या आतच पंचायत स्तरीय निवडणुका झाल्या आहेत,” असंही नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदींनी यावेळी जम्मू काश्मीरमधील स्थानिक निवडणुकांमुळे लोकशाहीचा पाया घट्ट झाल्याचं सांगत मतदारांचं अभिनंदन केलं.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह राहुल गांधी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची गुरुवारी भेट घेऊन दोन कोटी स्वाक्षऱ्यांचे निवेदन सादर केलं. यानंतर राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
“कोणतीही चर्चा न करता संमत केलेले कायदे रद्द झाले पाहिजेत. अन्यथा दिल्लीच्या सीमांवरील आंदोलक शेतकरी मागे फिरणार नाहीत. ते वैतागून, त्रासून घरी जातील असे मोदींना वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम असेल. शेतकरी कडाक्याची थंडी, त्रास, कष्ट, वेदना सहन करत आहेत. पंतप्रधानांनी त्यांचे म्हणणे ऐकावे. अवघा देश पाहात आहे. या शेतकऱ्यांच्या ताकदीसमोर कोणी उभे राहू शकणार नाही,” असा इशाराही राहुल यांनी दिला.
“प्रशासकीय अधिकारांच्या विकेंद्रीकरणाची सूचना केली होती. कोरोना नियंत्रणासाठी मुख्यमंत्र्यांना अधिकार देण्यास मोदी यांनी नकार दिला. आताही ते शेती कायदे मागे घेण्यास नकार देत आहेत. मोदी यांच्या या कडव्या भूमिकेमुळे भाजप, संघाचे नव्हे तर देशाचे, शेतकऱ्यांचं, कामगारांचं नुकसान होईल,” असेही राहुल गांधी म्हणाले.
“मोदी अकार्यक्षम असून त्यांना प्रशासन कसे चालवले जाते याची यित्कचितही माहिती नाही. त्यांच्या नजीकच्या तीन-चार भांडवलदारांच्या आधारे ते देश चालवत आहेत. त्यांच्याविरोधात अवाक्षरही काढलेले चालत नाही, जर सरसंघचालक मोहन भागवत हे मोदी यांच्याविरोधात बोलले तर त्यांनादेखील दहशतवादी ठरवले जाईल,” असा गंभीर आरोपही राहुल गांधी यांनी केला.