नवी दिल्ली : वृत्तसंस्था । राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकार पेट्रोल – डिझेलवरील कर आणखी वाढवण्याच्या तयारीत असल्यावरून त्यांनी आता पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.
”मोदीजी जनतेला लुटणं सोडा, आपल्या मित्रांना पैसा देणं बंद करा, आत्मनिर्भर बना” अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी वर्तमानपत्रातील सरकार पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स आणखी वाढवण्याच्या तयारीत असल्याच्या संदर्भातील बातमी देखील जोडली आहे.
या अगोदर देखील सातत्याने राहुल गांधी यांनी विविध मुद्यांवरून पंतप्रधान मोदीसह भाजपावर टीका केली आहे. बिहारमध्ये प्रचार रॅलीत बोलताना त्यांनी आरोप केला होता की, मोदी सरकारला शेतकरी, छोटे व्यापारी आणि मध्यमवर्गीय यांची चिंता नाही. केवळ काही उद्योजकांसाठीच ते काम करत आहे.
अंबानी आणि अदानीसाठी मोदी मार्ग सुकर करत आहेत. शेतकरी, कामगार व दुकानदारांना दूर करत आहेत. येणाऱ्या काळात तुमचा सर्व पैसा देशातील दोन-तीन श्रीमंतांच्या हाती जाईल, असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.
नोटबंदी केली आपल्याला फायदा झाला का? तुमचा पैसा घेतला आणि भांडवलदारांचं कर्ज माफ केलं. आता तीन कृषी कायदे केले आहेत. ते संपूर्ण देशात बाजार समिती व्यवस्था संपवणार आहेत. लाखो लोकांना बेरोजगार करणार आहेत अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती.